लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 08:49 PM2019-03-27T20:49:18+5:302019-03-27T20:52:37+5:30
ही कारवाई आज दुपारी ४.३० वाजता करण्यात आली.
गोंदिया - लोकसभा निवडणुकीला घेऊन जिल्ह्यात वेगवेगळ्या सात ठिकाणी आंतरजिल्हा व आंतरराज्यीय सीमा तपासणी नाके तयार करण्यात आले. यापैकी देवरीच्या तपासणी नाक्यावर ५ लाख रूपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई आज दुपारी ४.३० वाजता करण्यात आली.
२७ मार्चला पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात सिरपूर (देवरी) सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना छत्तीसगडच्या बाघ नदीकडून देवरीकडे शेवरोलैट कार क्र.एमएच २७/बीई-९४७० ची तपासणी करण्यात आली. या कारमधील मधल्या सीटवर ५० बॉक्स ठेवले होते. प्रत्येक बॉक्समध्ये दोन किलो गांजा होता. एकूण पाच लाख रूपये किंमतीचा १०० किलो गांजा व ६ लाख रूपये किंमतीची कार पोलिसांनी जप्त केली आहे. देवरी पोलिसांनी मादक पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत अमरावतीच्या बेलपुरा येथील नितेश नारायण पिवान (४०), अमरावतीच्या केलियानगर येथील आकाश दिलीप मोरे (१८) व हनुमान नगर अमरावती येथील किसन श्यामराव खरवडे (२२) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव, उपनिरीक्षक चंद्रहार पाटील व त्यांच्या चमूने केली आहे.
तपासणी नाक्यावर २८.५३ लाखाचा माल जप्त
जिल्ह्यात सात ठिकाणी उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर आतापर्यंत ३०८९ वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील २०० वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. १० ते २६ मार्च दरम्यान १६ पोलीस ठाण्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत २३१ दारू अड्यांवर धाड टाकण्यात आली. यातील २४५ आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून २ लाख ६६ हजार ७४५ रूपये किंमतीची २ हजार ७०९ लीटर हातभट्टीची दारू, ९८ हजार ७३१ रूपये किंमतीची ३३१ लीटर देशी दारू, ५ लाख ९४ हजार रूपये किंमतीचे ७ हजार ७६५ किलो मोहफुल, ३८ हजार ९७४ रूपये किंमतीची ७३.४३ लीटर विदेशी दारू, तर १७ लाख ४९ हजार १९० रूपयांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये एकूण २८ लाख ५३ हजार ५५० रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.