समृद्धी महामार्गावर साडेआठ लाखांचा गांजा जप्त; दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 07:32 AM2023-10-07T07:32:44+5:302023-10-07T07:45:08+5:30
एलसीबीची मेहकर नजीक साबरा शिवारात कारवाई: अकोला व जालन्यातील दोघे ताब्यात
दत्ता उमाळे
मेहकर (जि.बुलढाणा): समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील साब्रा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाईत ८ लाख ४० हजार रुपयांच्या गांजाच्यासह लोखंडाचा चुरा घेऊन जाणारा एक ट्रक जप्त केला आहे. समृद्धी महामार्गावर गांजा जप्ती संदर्भातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. या कारवाईत पोलिसांनी जालना येथील ट्रक चालक अब्दुल गफूर रशीद (३२, रा. जाफर चाळ, जुना जालना) आणि सहचालक मोहम्मद अबीद मोहम्मद सादिक (३५, रा. आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला) या दोघांना ताब्यात घेतले आहे. एमएच-२६-बीई ०८५१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये नेण्यात येत असलेल्या लोखंडाच्या चुरीमध्ये हा ४२ किलो गांजा लपवून ठेवला होता.
गोपनिय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साब्रा शिवारातील मेहकर एक्झिस्ट पाईंटवर ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. कारवाईदरम्यान मेहकरचे नायब तहसिलदार नितीन बोरकर हे ही प्रामुख्याने उपस्थित होते. पोलिसांनी साडेआठ लाख रुपयांचा हा गांजा व १५ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाईदरम्यान जप्त केला आहे. सध्या हा ट्रक मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लावण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक लांडे यांच्यासह एपीआय विलास कुमार सानप, पीएसआय सचीन कानडे, दीपक लेकुरवाळे, शरद गिरी, गणेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.