गोव्यातील हणजूण येथे ५ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त
By काशिराम म्हांबरे | Published: January 31, 2024 03:33 PM2024-01-31T15:33:31+5:302024-01-31T15:34:34+5:30
किनारी भागातील अमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेली मोहीम भविष्यातही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
म्हापसा: किनारी भागात अमली पदार्थांच्या तस्कराविरोधात पोलिसांची जोरदार कारवाई सुरूच आहे. मागील दोन दिवसात दोन ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून अमली पदार्थ जप्त केले आहेत.
काल ३० जानेवारी रोजी, हणजूण पोलिस स्थानकाच्या हद्दीत सिसिरा नायक ( वय २३, मूळ ओडिशा ) या तस्करावर कारवाई करून त्याच्याकडून पाच लाख रुपये किमतीचा गांजा पकडण्यात आला आहे. हि कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली, पोलीस उपनिरीक्षक आशीष पोरोब यांच्या पथकाकडून करण्यात आली होती.
दोन दिवसापूर्वी सिकेरी-कांदोळी येथे कळंगुट पोलिसांनी छापा मारून संशयित इब्राहीम पस्तूनी ( पर्वरी) याला अटक करुन त्याच्याकडून ९२ हजार रुपये किंमतीचा ९२० ग्राम गांजा जप्त केला होता. किनारी भागातील अमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेली मोहीम भविष्यातही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली. पुढील तपास कार्य उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश चोडणकर आणि पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे.