गणपत गायकवाड जमीन गोळीबार प्रकरण! बिल्डर पुन्हा गावगुंडांना घेऊन आला, पोलिसांना धावत यावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 06:20 PM2024-09-02T18:20:08+5:302024-09-02T18:20:29+5:30
भाजपाचे आमदार गणपत गायकवाड हे सध्या तुरुंगात आहेत. तर पोलीस ठाण्यातील गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड हे पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड प्रकरण शांत होत नाही तोच पुन्हा जमिनीचा वाद उफाळून आला आहे. या जमिनीची मोजणी करण्यासाठी बिल्डर गावगुंडांना घेऊन प्लॉ़टवर पोहोचला होता. पुन्हा एकदा शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी पोलिसांना घेत तिथे धडक देत गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा जमिनीचा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपाचे आमदार गणपत गायकवाड हे सध्या तुरुंगात आहेत. तर पोलीस ठाण्यातील गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड हे पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील एका जागेवरील ताबा मिळविण्यावरून हा वाद झाला होता. आता या घटनेचा धुरळा खाली बसताच बिल्डरने जमीन ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे समोर आले आहे.
ही वादग्रस्त जमीन मोजणी करण्यास बंदी घातलेली असूनही हा बिल्डर गावगुंडांना बंदुका, धारधार शस्त्रांसह घेऊन आला होता. याची माहिती शेतकऱ्यांनी पुन्हा महेश गायकवाड यांना दिली. महेश गायकवाड आणि शिंदेंचे कार्यकर्ते पोलिसांना घेऊन बिल्डर आलेल्या जमिनीवर पोहोचले. या गुंडांना पकडून पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. यावेळी जमीन मोजणीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना गुडांकरवी मारहाणही करण्यात आली आहे. पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.
गोळीबार कधी झालेला...उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी दुपारी शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यासह ६० ते ७० जणांवर द्वारली येथील वादग्रस्त जमिनीवर प्रवेश केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. तर रात्री साडे नऊ वाजता जमीनमालक जाधव कुटुंबाच्या तक्रारीवरून आमदार गणपत गायकवाड यांच्यासह ८ जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. याबाबतच्या चौकशीसाठी हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिन मध्ये सुरवातीला आमदार पुत्र वैभव गायकवाड, त्यानंतर शिवसेना नेते महेश गायकवाड, राहुल पाटील व जमीनमालक चैनू जाधव आले होते. पावणे ११ वाजता आमदार गणपत गायकवाड केबिन मध्ये आल्यावर वैभव गायकवाड केबिन बाहेर गेले. त्यानंतर केबिन बाहेर समर्थकात शिवीगाळ, हाणामारी, धक्काबुकीं व शस्त्र काढण्याचे प्रकार झाले. त्यांना शांत करण्यासाठी पोलीस अधिकारी जगताप केबिन बाहेर गेल्यानंतर, आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला.