नागपुरात कचरा वेचणाऱ्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:25 PM2020-07-18T22:25:18+5:302020-07-18T22:26:42+5:30
कचरा वेचणाऱ्या एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत चिंगरू नावाने ओळखला जात होता. त्याच्यासोबत नेहमी राहणारा प्रकाश नामक तरुण बेपत्ता असल्यामुळे त्यानेच ही हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कचरा वेचणाऱ्या एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत चिंगरू नावाने ओळखला जात होता. त्याच्यासोबत नेहमी राहणारा प्रकाश नामक तरुण बेपत्ता असल्यामुळे त्यानेच ही हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
मानकापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० च्या सुमारास क्रीडा संकुलाजवळ कचरा गाडीचा एक चालक कचरा फेकायला गेला होता. त्याला रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर मानकापूरचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. मृताचा चेहरा दगडाने ठेचल्यामुळे ओळख पटविणे कठीण झाले होते. त्याच्या हातावर शंकर असे नाव गोंदले होते. आजूबाजूच्यांनी तो चिंगारू असल्याचे सांगून या भागात प्रकाश नामक व्यक्तीसोबत कचरा वेचतो आणि वीज मंडळाच्या कार्यालयाजवळ एका झोपड्यात राहतो, अशी माहिती दिली. पोलिसांनी प्रकाशची शोधाशोध केली. मात्र तो मिळाला नाही. त्यामुळे त्यानेच ही हत्या केली असावी, असा संशय आहे. विशेष म्हणजे, प्रकाश आणि चिंगारु सोबतच कचरा वेचत आणि रात्री एकत्र दारू पित होते, असे अनेकांनी सांगितले आहे. दरम्यान गेल्या ४८ तासातील हत्येची ही चौथी घटना आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
प्रकाशची शोधाशोध
प्रकाशला वृद्ध आई आहे. ती मानकापूरच्या ताजनगर झोपडपट्टीत राहते. त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याने तो एखादवेळी आईकडे जातो. काही दिवसापासून तो आईकडेही आला नाही,अशी माहिती पुढे आली आहे. तो सापडल्यानंतरच या हत्या प्रकरणाचा छडा लागेल, असे पोलीस म्हणतात. पोलीस त्याची शोधाशोध करीत आहेत.