उसने दिलेले पैसे मागितल्याने गॅस मेकॅनिकची हत्या; तीन जणांना बेड्या
By पंकज पाटील | Published: December 10, 2022 07:58 PM2022-12-10T19:58:39+5:302022-12-10T19:59:23+5:30
याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही तासांतच तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
बदलापूर : उसने दिलेले पैसे परत मागितले, म्हणून नातेवाईकांनीच एका गॅस मेकॅनिकची हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही तासांतच तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
बदलापूर पश्चिमेच्या वडवली चौकात श्रवणकुमार बिष्णोई आणि प्रकाश बिष्णोई हे दोघे एकाच घरात राहत होते. हे दोघेही एका गॅस एजन्सीत मेकॅनिक म्हणून काम करत होते. श्रवणकुमार याने प्रकाश याचा सोलापूर येथे राहणारा भाऊ बुधाजी बिष्णोई याला काही उसने पैसे दिले होते. मात्र हे पैसे तो परत करत नसल्याने श्रवणकुमारने बुधाजी याला फोनवरून शिवीगाळ केली होती.
याचा राग मनात धरून ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या दरम्यान बुधाजी बिष्णोई याने त्याचा भाऊ प्रकाश आणि साथीदार दिनेश बिष्णोई यांना सोबत घेऊन श्रवणकुमारचं घर गाठले. तिथे त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याचा गळा दाबून खून केला आणि त्याचा मृतदेह तिथेच टाकून पळून गेले. हे तिघेही पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.
दुसरीकडे पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यूची नोंद केली, मात्र वैद्यकीय अहवालात श्रवणकुमारची हत्या झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यानंतर तांत्रिक तपास करत पोलिसांनी आरोपी बुधाजी बिष्णोई, प्रकाश बिष्णोई आणि दिनेश बिष्णोई यांना काही तासातच बेड्या ठोकल्या. या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे.