घरगुती सिलिंडरमधून गॅसची चोरी; गुन्हे शाखेने केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 06:46 PM2019-01-03T18:46:43+5:302019-01-03T18:49:09+5:30
डोंबिवली पूर्वेतील पेंढारकर महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या गोदामात गॅस चोरी करून त्या गॅसची बाजरात विक्री केली जात असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती.
डोंबिवली - घरगुती सिलिंडरमधील गॅस चोरून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून त्याची विक्री करण्याचा प्रकार कल्याण गुन्हे शाखेने डोंबिवलीत उघडकीस आणला आला आहे.
डोंबिवली पूर्वेतील पेंढारकर महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या गोदामात गॅस चोरी करून त्या गॅसची बाजरात विक्री केली जात असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी याठिकाणी छापा टाकला असता ही चोरी सुरू असल्याचे दिसून आले. एका लोखंडाच्या नळीद्वारे घरगुती सिलिंडरमधून गॅस काढून तो कमर्शियल सिलिंडरमध्ये भरला जात होता. या नळीद्वारे अवघ्या 10 सेकंदात 2 किलो गॅस चोरी केला जायचा. चोरून काढलेला या व्यावसायिक गॅसची बाजारात विक्री केली जात होती. कल्याण गुन्हे शाखेने याप्रकरणी 17 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये पोलिसांनी नेमके किती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, या छाप्यानंतर गॅस एजन्सीचा सुपरवायजर पळून गेला आहे. तर एजन्सी चालकाने मात्र याप्रकरणी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.