मामाच्या मुलाशी झालं होतं गौरीचं लग्न; हत्येनंतर आरोपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 16:42 IST2025-03-28T16:42:36+5:302025-03-28T16:42:56+5:30
आरोपी पतीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला चौकशीसाठी बंगळुरू येथे नेले जाईल.

मामाच्या मुलाशी झालं होतं गौरीचं लग्न; हत्येनंतर आरोपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
बंगळुरू इथं सुटकेसमध्ये ३२ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेची तिच्या पतीने हत्या करून पसार झाला होता. त्याला पुण्यात अटक करण्यात आली. मात्र पत्नीच्या हत्येनंतर आता आरोपी पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या पतीवर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरी खेडेकर असं मयत महिलेचे नाव आहे. गुरुवारी बंगलुरू एका फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सापडला. तिच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्या. ती मूळची महाराष्ट्रातील रहिवासी होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेचा पती राकेश खेडेकर पत्नी गौरीची हत्या करून पुण्याला पळाला होता. तिथे पतीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हत्येच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पुणे शहरातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बंगळुरूचं पोलीस पथक पुणे पोलिसांच्या मदतीने या घटनेचा तपास करत आहे. बंगळुरू पोलीस पुण्यात आहेत. आरोपी पतीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला चौकशीसाठी बंगळुरू येथे नेले जाईल. कौंटुबिक वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज आहे असं पोलिसांनी म्हटलं.
हत्येनंतर सासू सासऱ्यांना फोन
आरोपी राकेशनं गौरीची हत्या केल्यानंतर त्याच्या सासू सासऱ्यांना फोन केला. फोनवरून मी तुमच्या मुलीला मारून टाकलं असून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये आहे असं सांगितले. जावयाच्या फोननंतर सासू सासरे हादरले. आरोपीने या घटनेची माहिती घर मालकालाही दिली. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास घर मालकाने स्थानिक पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावले. जेव्हा पोलिसांनी घरचा दरवाजा उघडला तेव्हा एका ट्रॉली बॅगमध्ये महिलेचा मृतदेह ठेवल्याचं दिसून आले. महिलेच्या शरीरावर चाकूने हल्ला केल्याच्या खुणा आढळून आल्या.
दरम्यान, मृत गौरी सांबेकर ही आरोपी राकेशच्या आत्याची मुलगी होती. राकेशचे वडील राजेंद्र खेडेकर यांच्या सख्ख्या बहिणीच्या मुलीचं राकेशसोबत लग्न लावले होते. त्यामुळे गौरीची हत्या करणारा तिच्या मामाचा मुलगा होता. पत्नी गौरी रोज त्याच्याशी भांडायची म्हणून मी खून केल्याचं आरोपी राकेशने वडिलांना सांगितले. पत्नी मुलाला त्रास द्यायची, तिच्या आईनेही बऱ्याचदा मुलीला समजावलं. हत्येनंतर राकेशचा मला फोन आला, मी सुद्धा आत्महत्या करणार असल्याचं त्याने फोनवर सांगितल्याची माहिती राजेंद्र खेडेकर यांनी दिली.