गौरी लंकेश हत्या : सनातन साधक मुख्य आरोपीचे औरंगाबाद कनेक्शन उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 03:37 PM2020-01-10T15:37:10+5:302020-01-10T15:46:00+5:30
या पूर्वी अनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर आणि साहित्यीक गोविंद पानसरे खूनप्रकरणात औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे.
औरंगाबाद: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात औरंगाबाद कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. कर्नाटक विशेष तपास पथकाने(एसआयटी) गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी ऋषिकेश देवडीकर हा औरंगाबादेतील एन-९ भागात राहत होता. या पूर्वी अनिसचे नरेंद्र दाभोळकर आणि साहित्यीक गोविंद पानसरे खूनप्रकरणात औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे.
गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह डॉ. नरेंद्र दाभोळकर, साहित्यीक गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात एटीएस, सीबीआयने औरंगाबादेतील शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना अटक केली. हे दोन्ही संशयित सध्या कारागृहात आहेत. महाराष्ट्रातील नामवंत विचारवंताचा खूनप्रकरणात औरंगाबादचे नाव आल्याने शहरात खळबळ उडाली होती. या घटनेचा विसर पडतच असताना कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश खूनप्रकरणात एसआयटीने औरंगाबादच्या ऋषिकेश देवडीकरला शुक्रवारी अटक केली.
ऋषिकेशमूळचा सोलापूरचा होता, मात्र २०१२ पासून तो सिडको एन-९ मध्ये यशवंत शुक्ला यांच्या घरात भाडेकरू म्हणून आई-वडिल,पत्नी, आणि सात वर्षाच्या मुलीसह राहण्यास आला होता. ऋषिकेशने येथे आल्यानंतर पतंजलीचे साहित्य विक्रीचा घरातून व्यवसाय सुरू केला. ग्राहक वाढत असल्याचे पाहून त्याने एन-९,एम-२ रोडवर जगदीश कुलकर्णी यांचा गाळा भाड्याने घेऊन संस्कृती स्वदेशी साहित्य नावाने दुकान सुरू केले. येथे दुकान चालवित असताना तो सनातनचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असे. सनातनने आयोजित कार्यक्रमात त्याचा सक्रिय सहभाग असे, अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली.
सनातनचे पूर्णवेळ काम करण्यासाठी सोडले शहर
ऋषिकेशचे दुकान जोरात सुरू असताना सनातन संस्थेचे पूर्णवेळ काम करायचे आहे, असे सांगून दुकानमालक कुलकर्णी यांना सांगून त्याने नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याने दुकान बंद केले. दुकानातील मालासह कुलकर्णी यांनी त्याचे दुकान चालवायला घेतले. यानंतर ऋषिकेश पत्नी आणि मुलीला घेऊन गोव्यातील आश्रमात जायचे आहे, असे सांगून गल्लीतील लोकांना आणि आईवडिलांना औरंगाबादेतून गेला. यानंतर तो औरंगाबादला नाही. त्याचे वृद्ध आई-वडिल एप्रिल २०१९ मध्ये शुल्का यांचे घर सोडून मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या मुलाकडे राहण्यास गेले आहेत.