न्यूज क्लिकप्रकरणी दिल्ली पोलिसांनी केली गौतम नवलखा यांची चौकशी
By नारायण जाधव | Published: December 30, 2023 08:35 PM2023-12-30T20:35:21+5:302023-12-30T20:36:06+5:30
परदेशी फंड वापरल्याचा आरोप, आग्रोळीतील रणदिवे वाचनालयात दिली भेट
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांची शनिवारी दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकच्या कथित परदेशी फंड आणि देशविरोधी कारवाया संदर्भात चौकशी केली. नवलखा हे सध्या नवी मुंबईतील आग्रोळी येथील बी.टी. रणदिवे वाचनालयात न्यायालयाच्या आदेशावरून नजरकैदेत आहेत. त्या ठिकाणीच भेट देऊन दिल्ली पोलिसांच्या सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांची चौकशी केली.
ऑगस्ट महिन्यात विशेष सेलने न्यूजक्लिकच्या विरोधात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत एफआयआर नोंदविला होता. ‘भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा आणून देशाविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी’ चीनमधून मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा आरोप न्यूज क्लिकवर ठेवला आहे. यानंतर तपास यंत्रणेने न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि मानव संसाधन विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना ३ ऑक्टोबर रोजी अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
पोलिसांच्या एफआयआरमध्ये चीनकडून मिळालेला निधी गौतम नवलखा आणि त्यांचे सहकारी तिस्ता सीतलवाड, त्यांचे पती आणि जावेद आनंद आणि पत्रकार उर्मिलेश, अरात्रिका हलदर, परंजॉय गुहा ठाकूरता आणि अभिसार शर्मा आणि इतरांना वाटल्याचा आरोप ठेवला आहे. याशिवाय
नवलखा यांचे १९९१ पासून पुरकायस्थशी संबंध असून २०१८ पासून PPK NewsClick Studio Private Limited चे भागधारक असल्याचा आरोप आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत तोडफोड करण्यासाठी पुरकायस्थ यांनी - पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रसी अँड सेक्युलॅरिझम (PADS) - या गटाशी कट रचला असा आरोप आहे. याच आरोपांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांचे पथक नवलखा यांच्या चौकशीसाठी नवी मुंबईत आल्याचे सूत्रांनी सांगितले.