गावठी कट्टा, दोन जीवंत काडतुसे अन् चाकू; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 08:31 AM2023-02-26T08:31:50+5:302023-02-26T08:33:35+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी पकडले
नालासोपारा (मंगेश कराळे) :- ओस्तवाल नगरी येथील परिसरातील बार जवळ एक गावठी कट्टा, एक रामपूरी चाकू, दोन जीवंत काडतुसांसह एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री पकडले आहे. पृथ्वीराज कुंदनप्रसाद भारती असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तुळींज पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करत हा आरोपी गावठी कट्टा नालासोपारा शहरात कोणाला विकण्यासाठी आला होता याचा तपास करत आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओस्तवाल नगरी येथील ओम साई पॅलेस बारचे जवळ एक आरोपी गावठी कट्टा, एक रामपूरी चाकू, जीवंत काडतुसांसह विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमला कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावला होता. शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद दुचाकीवरून फिरताना दिसल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर एक गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि एक रामपुरी चाकु असे हत्यारे मिळून आली. आरोपी विरोधात गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, सुहास कांबळे, पोलीस हवालदार चंदन मोरे, महेश पागधरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर यांनी केली आहे.
एका आरोपीला अग्नीशस्त्र व जिवंत काडतुसांसह पकडले आहे. तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला तपास व चौकशीसाठी तुळींज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. - शाहूराज रणवरे (पोलीस निरीक्षक, युनिट दोन, गुन्हे शाखा)