लुटारूंकडून हस्तगत केलेले दागिने पोलिसांच्या तिजोरीतून गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 02:25 AM2019-07-12T02:25:31+5:302019-07-12T02:25:53+5:30

मुंबई : लुटारूंनी दागिने हिसकावून पळ काढल्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करीत आरोपींना पकडले खरे, मात्र त्या आरोपींकडून जप्त केलेले ...

Gems captured by the robbers are missing from the police escort | लुटारूंकडून हस्तगत केलेले दागिने पोलिसांच्या तिजोरीतून गहाळ

लुटारूंकडून हस्तगत केलेले दागिने पोलिसांच्या तिजोरीतून गहाळ

Next

मुंबई : लुटारूंनी दागिने हिसकावून पळ काढल्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करीत आरोपींना पकडले खरे, मात्र त्या आरोपींकडून जप्त केलेले दागिनेच गोरेगाव पोलीस ठाण्यातून गहाळ झाल्याने अनेक तक्रारदार हवालदिल झाले आहेत. याबाबतचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे.


सिद्धार्थ नगर येथे राहाणाऱ्या सौम्या मोहन १४ एप्रिल २0१८ रोजी रात्री सव्वानऊ वाजता श्रीरंग साबळे मार्गावरून पायी जात असताना एका मोटरसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावून पोबारा केला. त्या पर्समध्ये दोन सोनसाखळ्या आणि रोख ६00 रूपये असा एकूण ६५ हजारांचा ऐवज होता. त्या घटनेबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुमारे आठ महिने अथक तपास करून गोरेगाव पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून चोरीस गेलेला सौम्या मोहन यांचा ऐवजही हस्तगत केला. लुटारूंनी पळवलेले आपले दागिने मिळताच पोलिसांनी सौम्या मोहन यांना त्याबाबत कळवून दागिने परत मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार अर्ज करताच बोरीवली येथील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयानेही ठरलेल्या अटींवर पोलिसांना दागिने सौम्या मोहन यांना परत करण्याचे आदेश दिले.


मात्र त्यानंतर पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही सौम्या मोहन यांना दागिने देण्यास पोलीस टाळाटाळ करू लागले. पाच - सहा महिने वाट पाहून सौम्या मोहन यांनी १५ मे २0१९ रोजी पोलिसांना दागिने परत करण्याविषयी पत्र दिले. त्यानंतर महिन्याभराने गोरेगाव पोलीस ठाण्याने त्यांना पोलीस ठाण्यातील मुद्देमाल गहाळ झाल्याने दागिने परत करता येत नसल्याचे कळवले.


सुमारे १२0 दागिने गोरेगाव पोलीस ठाण्यातून गहाळ झाल्याचे उघडकीस आल्याने याबाबतचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या कक्ष अकराकडे सोपवण्यात आला आहे. आरोपींकडून हस्तगत झालेला ऐवज पोलिसांच्याच ताब्यात असताना गहाळ झाल्याबाबत तक्रारदार संताप व्यक्त करीत आहेत. गोरेगाव पोलीस ठाण्यातील जबाबदार अधिकाºयाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी तक्रारदारांच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
 

याबाबत तपास सुरू असून हे दागिने कोणत्या कालावधीत आणि कोणते पोलीस कर्मचारी तेथे नियुक्त असताना गहाळ झाले याचा शोध घेतला जात आहे. नेमका किती किमतीचा ऐवज गहाळ झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- चिमाजी आढाव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक,
गुन्हे अन्वेषण विभाग, कक्ष ११

Web Title: Gems captured by the robbers are missing from the police escort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस