वाईतील बंगल्यात जर्मन नागरिकांनी लावला गांजा, दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:41 PM2021-02-16T22:41:57+5:302021-02-16T22:42:23+5:30
पोलिसांची कारवाई : वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणी छापा; सव्वा आठ लाखांचा ऐवज जप्त
सातारा : वाई शहरातील एका बंगल्यात वास्तव्यास असणाऱ्या जर्मनीच्या दोन नागरिकांवर गांजाची रोपे लावल्याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. तसेच या कारवाईत गांजा रोपे आणि बोंडांसह इतर साहित्य मिळून सुमारे सव्वा आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर संबंधित दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस दलातील विशेष शाखेला वाईतील नंदनवन कॉलनीमधील श्री विष्णूस्मृती बंगल्यात दोन परकीय नागरिक राहत आहेत. तसेच त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंगल्यात छापा टाकला. यावेळी विशेष शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, हवालदार विश्वास देशमुख, सागर भोसले, सुमीत मोरे, चालक संभाजी साळुंखे यांच्यासह वाईचे पोलीस निरीक्षक खोबरे, पोलीस उपनिरीक्षक कदम हेही सहभागी झाले.
छाप्यावेळी पोलिसांना बंगल्यात दोन जर्मन नागरिक आढळून आले. त्यावेळी संबंधितांनी सर्गीस व्हिक्टर मानका (वय ३१) आणि सेवेस्टीएन स्टेन मुलर (वय २५, दोघेही रा. जर्मनी) अशी नावे सांगितली. या बंगल्यात तपासणी केल्यावर गांजाची काही लहान-मोठी रोपे आढळून आली. तसेच गांजाची बोंडेही सापडली. या कारवाईत पोलिसांनी २९ किलो गांजा व बोंडे जप्त केली. याची किंमत २ लाख ३६ हजार ७६० रुपये आहे.
त्याचबरोबर या कारवाईत पोलिसांनी कोकोपीट, खते, भुश्याची पोती, केमीकल फवरणीचा पंप, टेबन फॅन, तापमापक दर्शक मिटर, इनव्हर्टर, बॅटºया, पॉली हाऊस, दुचाकी, लॅपटॉप व मोबाइल जप्त केला. या सर्वांची किंमत ८ लाख २१ हजार इतकी आहे.
दरम्यान, संबंधित जर्मन नागरिकांच्या विरोधात वाई पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी घटनास्थळ भेट देत कारवाईबाबत मार्गदर्शन केले.
गोव्यातही एक गुन्हा नोंद...
वाईतील या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिली. संबंधित जर्मन नागरिकांवर २०१७ मध्ये गोवा येथे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातून ते जामीनावर सुटले आहेत. वाईतील बंगल्यात ते सव्वा वर्षापासून वास्तव्यास होते. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे, अशी माहितीही पोलीस अधीक्षक बन्सल यांनी या पत्रकार परिषदेत दिली.