वेश्या व्यवसायातून '' मॉडेल '' ची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 07:52 PM2019-07-19T19:52:29+5:302019-07-19T19:52:47+5:30
कला शाखेच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेली ही तरुणी गुन्हे शाखेने कोरेगाव पार्क भागात केलेल्या कारवाईत पोलिसांच्या जाळ्यात अडकली...
पुणे : वडिलांचा झालेला मृत्यू... आईसह घर सांभाळण्याची असलेली जबाबदारी आणि स्वत:च्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी दिल्लीमध्ये राहणारी आणि मॉडेलिंग करणारी 'ती' वेश्या व्यवसायामध्ये आली. कला शाखेच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेली ही तरुणी गुन्हे शाखेने कोरेगाव पार्क भागात केलेल्या कारवाईत पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पोलिसांना दिलेल्या जबाबातून तिची कहाणी समोर आली आहे.
पोलीस मागील तीन ते चार दिवसांपासून या कारवाईकरिता प्रयत्न करीत होते. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून पीडीत तरुणीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. रोहीत भगवान कांबळे (वय 28, रा. महादेव मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागात दिल्लीतील काही तरुणींना फुस लावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभाग व गुन्हे शाखा युनिट 2 यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये कोरेगाव पार्क भागातील लेन क्र 5 समोरील एका उच्चभ्रु सोसायटीत सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.
वेश्या व्यवसायास मुली पुरविणा-या रोहीतला अटक करण्यात आली. त्याच्या इतर दोन फरार साथीदारांचा शोध सुरु आहे. अटक आरोपी वेश्या व्यवसायाकरिता फोनवर बुकिंग घेऊन मुली पुरविण्याचे काम करीत होता. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख, भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 चे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्या पथकाने केली.
* वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलीला मॉडेलिंग व्यवसायात करिअर करण्याची इच्छा होती. ती सध्या दिल्लीतील एका महाविद्यालयात कला शाखेच्या दुस-या वषार्ला शिकत आहे. तिच्या वडिलांचे निधन झालेले आहे. ती आईसह दिल्लीत राहते.
* कसे चालते सेक्स रॅकेट?
आरोपी कांबळे आणि त्याचे साथीदार दिल्लीतील मुलींच्या संपर्कात राहतात. ग्राहकांच्या मागणीनुसार मुलींना दोन ते तीन दिवसांकरिता पुण्यात आणले जाते. त्यांची राहण्याची आणि जेवण्याची सर्व व्यवस्था केली जाते. ही माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच दरम्यान ही तरुणी काही दिवसांपूर्वीच पुण्याला आली होती. तेव्हापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते.