फोन करण्यास मोबाइल न दिल्याने घाटकोपरमध्ये तरुणावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:36 PM2018-09-10T13:36:31+5:302018-09-10T13:37:39+5:30
पळून गेलेल्या या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये प्रणेश चंद्रकांत डुंबरे आणि हिमनाथ गोळे यांचा समावेश आहे.
मुंबई – फोन करण्यास मोबाइल दिला नाही म्हणून रागाच्या भरात दोन तरुणांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घाटकोपर परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य भा. दं. वि. कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये प्रणेश चंद्रकांत डुंबरे आणि हिमनाथ गोळे यांचा समावेश आहे.
प्रणेय हा कल्याण येथे राहतो. काल रात्री दोन वाजता तो त्याच्या बाईकवरून मित्र हिमनाथसोबत जात होता. घाटकोपर येथील एमएसएस रोड, डॉ. चौबे हॉस्पिटलजवळ येताच दोन्ही आरोपी तरुणांनी त्याला आवाज देऊन थांबविले. एका तरुणाने घरी फोन करायचा आहे असे सांगून प्रणेयकडे मोबाइल मागितला. मात्र, प्रणेयने त्याला मोबाईल देण्यास नकार दिला. याच कारणावरून या दोघांनी प्रणेयशी वाद घालून त्याच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला.
यावेळी हिमनाथने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर या दोघांनी हल्ला केला. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी तेथून पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना तातडीने पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. प्रणेयच्या जबानीवरून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह अन्य भा. दं. वि. कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.