घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 09:08 AM2024-06-01T09:08:41+5:302024-06-01T09:09:03+5:30

स्ट्रक्चरल ऑडिटरला ५ जूनपर्यंत कोठडी, २५ हून अधिक होर्डिंग्जला दिले होते प्रमाणपत्र

Ghatkopar Hoarding Tragedy Case: Ex-Director's Involvement, Police Claim in Sessions Court | घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घाटकोपर होर्डिंग  दुर्घटनेप्रकरणी इगो मीडिया प्रा.लि.ची माजी संचालक जान्हवी मराठे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. होर्डिंग बसविण्यात जान्हवी हिचा थेट आणि सक्रिय सहभाग असल्याचा दावा पोलिसांनीन्यायालयात केला. आपला सहभाग स्वाक्षरीपुरताच होता, असे जान्हवीने अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे. न्या. राजेश सासणे यांनी शुक्रवारी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

जान्हवीने तिच्या अर्जात म्हटले आहे की, ती फर्मची संचालक होती; परंतु डिसेंबर २०२३ मध्ये तिने राजीनामा दिला आणि वादग्रस्त होर्डिंग भावेश भिंडेच्या देखरेखीखाली उभारण्यात आले. तिने करारावर केवळ स्वाक्षरी केली आहे. या प्रकरणात आपल्याला ‘बळीचा बकरा‘ बनविण्यात येत आहे. खरा गुन्हेगार भावेश आहे. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. एफआयआरमध्ये आपले नाव नाही. भिंडे याने आपली फसवणूक केली असून, बलात्कारही केला आहे आणि यासंबंधी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे अर्जात म्हटले आहे.

होर्डिंग उभारण्यात आलेली जागा मध्य रेल्वेची असल्याने मुंबई महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे जान्हवीने अर्जात नमूद केले आहे. पोलिसांनी तिच्या जामीन अर्जाला विरोध केला. वादग्रस्त होर्डिंगला परवानगी मिळवण्यापासून ते उभारेपर्यंत आणि कार्यान्वित करेपर्यंत जान्हवी फर्मच्या संचालकपदी होती. ती २१ डिसेंबर २०२३ पर्यंत फर्ममध्ये काम करत होती.

  1. जान्हवीचा थेट संबंध भावेश भिंडेशी आहे. होर्डिंगला परवानगी मिळवण्यापासून ते बसवेपर्यंत आणि कार्यान्वित करेपर्यंत ती फर्ममध्ये होती. तिला त्याचा आर्थिक मोबदला मिळाला आहे. तिने फर्म सोडले असले तरी तिच्या महागड्या कारचा हप्ता कंपनी फर्म भरत आहे. त्यामुळे केवळ कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापर्यंतच तिची भूमिका मर्यादित होती, असे म्हणणे चुकीचे आहे. संचालक म्हणून तिचा यामध्ये थेट आणि सक्रिय सहभाग होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.
  2. त्याशिवाय हे होर्डिंग उभारण्यासाठी जान्हवीने ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्र लिहिले होते. त्यावर तिचीही स्वाक्षरी आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने जान्हवी मराठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.


‘होर्डिंगसाठी देखरेख न करताच दिले सर्टिफिकेट’

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात स्ट्रक्चरल ऑडिटर मनोज रामकृष्णा संघू (४७) याने होर्डिंगच्या बांधकामाची देखरेख न करता स्टेबिलिटी प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या होर्डिंगखाली कोसळून १७ जणांचा बळी गेला. न्यायालयाने त्याला शुक्रवारी ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १ जून २०२२ ते १० एप्रिल २०२४ दरम्यान मनाेजच्या खात्यात भावेश भिंडेच्या इगो प्रायव्हेट लिमिटेडच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून त्याच्या एचडीएफसी बँक खात्यात महिन्याला ठराविक रक्कम जमा होत होती. यासाठी नेमका किती रुपयांचा व्यवहार ठरला? याबाबत गुन्हे शाखा अधिक चौकशी करत आहे.  

Web Title: Ghatkopar Hoarding Tragedy Case: Ex-Director's Involvement, Police Claim in Sessions Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.