पोलीस काका, ५ जणांना मर्डर झालाय; तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा पोलिसांना कॉल; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 06:23 PM2021-07-26T18:23:43+5:302021-07-26T18:25:32+5:30
मुलीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली; तिच्या नंबरवर कॉल केला
गाझियाबाद: पाच जणांचा खून झाला असून मी एकटीच आहे, असा फोन एका तिसरीत शिकणाऱ्या एका मुलीनं पोलिसांना केला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं मुलीनं सांगितलेल्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधाशोध केली. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीला फोन केला. तो तिच्या वडिलांनी उचलला. त्यानंतर समोर आलेली माहिती ऐकून पोलिसांनी डोक्यावर हात मारून घेतला.
उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या एका तिसरीत शिकणाऱ्या मुलीनं वडिलांच्या मोबाईलवरून शुक्रवारी पोलिसांना फोन केला. ''पोलीस काका, ५ खून झाले आहेत. गल्ली क्रमांक ५, सरकारी शाळेजवळ. तुम्ही लवकर या. मी एकटी आहे,'' असं मुलीनं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांचं पथक तातडीनं मुलीनं सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलं. मात्र पोलिसांना तिथे काहीही आढळून आलं नाही.
पोलिसांनी मुलीच्या नंबरवर फोन केला. मात्र तो स्विच्ड ऑफ होता. अर्ध्या तासानंतर नंबर पुन्हा सुरू झाला. पोलिसांनी त्या नंबरवर फोन केला. तो मुलीच्या वडिलांनी उचलला. त्यांच्याशी बोलल्यानंतर मुलीनं खोडी काढण्यासाठी कॉल केल्याची माहिती पोलिसांना समजली. मुलीनं याआधीही अनेकदा असे कॉल केले आहेत. माझ्या वडिलांचा अपघात झाला आहे, असे कॉल तिने काही नातेवाईकांना आधी केले होते. त्यानंतर सगळ्या नातेवाईकांनी मुलीच्या घरी धाव घेतली होती. ही मुलगी टीव्हीवर गुन्हेगारीशी संबंधित कार्यक्रम जास्त पाहत असल्याचं पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं.