२ बहिणींना बेदम मारलं, एकीचा मृत्यू; आवाज कुणीही ऐकू नये म्हणून गाणी वाजवली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 04:24 PM2023-06-22T16:24:42+5:302023-06-22T16:25:09+5:30
१९ जून रोजी रमेश आणि हिना यांच्या ६ वर्षीय मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती
गाझियाबाद - शहरातील सिद्धार्थ विहार येथे नातेवाईकांच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या सहारनपूर येथील दोन बहिणींना बेदम मारहाण करण्यात आली आहे. समीना(२३) आणि सानिया(३०) असं या दोन बहिणींची नावे असून या दोघींना जमावाने मारहाण केली. मंगळवारी रात्रभर या दोघींना निर्दयीपणे लाठीकाठीने मारण्यात आले. या मारहाणीत समीनाचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. प्रत्यक्षदर्शीनुसार, या मुलींच्या किंकाळ्या ऐकायला येऊ नये यासाठी मोठ्याने गाणी वाजवण्यात आली. या घटनेत सानियाच्या तक्रारीवरून ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
१९ जून रोजी रमेश आणि हिना यांच्या ६ वर्षीय मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यात सहारनपूरच्या इंद्रपूर कॉलनीत राहणारी हिनाच्या भावाची बायको सानिया आणि मेव्हणी समीना या दोघी सहभागी झाल्या होत्या. सर्व नातेवाईक पार्टीतून गेल्यानंतर घरातील ५ लाखांचे दागिने गायब झाल्याचे कळाले. त्यानंतर हिना आणि रमेशने सर्वांना परत बोलावले.
सानिया मंगळवारी संध्याकाळी आली तर समीना रात्री उशिरा पोहचली. सानियाने पोलिसांना सांगितले की, रमेश आणि हिना सर्व नातेवाईकांची चौकशी करत होते. एक-एक करून सर्वांना जायला सांगितले. फक्त आम्हाला थांबवले. आम्ही चोरी केली नाही असं त्यांना म्हटलं. त्यानंतर समीनाला बोलावले. हिना-रमेश म्हणत होते, दागिने तू नव्हे तर तुझ्या बहिणीने चोरले आहेत. समीनाला विचारणा केली असता तिनेही नकार दिला. त्यानंतर सुरुवातीला तिला कानाखाली लगावली मग लाठीकाठीने मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतरही ती मी दागिने चोरले नाही असं विनवणी करत होती. त्यानंतरही अत्यंत क्रूरपणे लोखंडी रॉड आणि ब्लेडने तिला मारण्यात आले.
समीनाची तब्येत बिघडली, तिचा मृत्यू झाला तरीही मारहाण सुरू होती. रात्रभर आवाज ऐकून शेजाऱ्यांनी सकाळी पोलिसांना बोलावले. सानियाने रमेश, त्याची पत्नी हिना, मित्र हिमांशु, साडू नौशाद, माजिद, नातेवाईक ईशान, रुखसार यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. समीनाच्या मृत्यूनंतर आरोपींनी पुरावे लपवण्यासाठी तिच्या शरीरावरील रक्त लागलेली कपडे बदलले होते. घटनास्थळी रक्त पुसून टाकले होते. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं.