"आई, जिथे आयुष्य जगण्यासाठी मानसन्मान विकावा लागतो.."; सुसाइड नोट लिहून मुलीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:37 AM2022-05-16T11:37:14+5:302022-05-16T11:37:27+5:30
इतकेच नाही तर युवकांनी या मुलीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता. मुलीने विरोध केला असता तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.
फतेहपूर – उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात बीएला शिकणाऱ्या विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवतीच्या आईनं या प्रकरणी २ युवकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलीस युवतीची छेड काढणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत.
ही घटना फतेहपूर जिल्ह्यातील रिठवा गावातील आहे. युवतीच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, गावात शेजारी राहणाऱ्या २ युवकांनी मुलीला सातत्याने त्रास दिला. मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा युवकांना समज देण्यात आली. परंतु अनेकदा समजवूनदेखील युवकांनी काही ऐकलं नाही. युवती तिच्या आई आणि बहिणीसोबत राहत होती. आरोपी सौरभ सिंह आणि तेज बहादूर सिंह मागील २ वर्षापासून धाक दाखवत युवतीची छेड काढत होते.
इतकेच नाही तर युवकांनी या मुलीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता. मुलीने विरोध केला असता तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. आरोपींकडून होणारा छळ युवतीला सहन होत नव्हता. ती खूप घाबरली होती. ही बाब तिने घरच्यांना सांगितली. त्यानंतर १३ मे रोजी युवतीने त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली. युवतीने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट आता पोलिसांच्या हाती लागली आहे.
या सुसाइड नोटमध्ये लिहिलंय की, आई, जिथे आयुष्य जगण्यासाठी मानसन्मान विकावा लागतो असं आयुष्य जगून काय फायदा? मी आता त्रस्त झाली आहे. त्यामुळे माझं आयुष्य संपवत आहे. मुलीच्या सुसाइड नोटच्या आधारे आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. मात्र आता आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मृत मुलीच्या मामाने सांगितले की, शेजारी राहणारे २ युवक भाचीला छेडत होते. त्यामुळे तिने विष पिऊन आत्महत्या केली. गंभीर असताना तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु त्याठिकाणी तिची प्राणज्योत मालावली. या प्रकरणी सीओ अनिक कुमार यांनी आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. लवकरच त्यांना कायदेशीर शिक्षा होईल अशी माहिती दिली आहे.