हृदयद्रावक! आई रागावली म्हणून मुलीने मैत्रिणीसह केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 06:09 AM2021-06-13T06:09:11+5:302021-06-13T06:09:30+5:30
कसारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पेठ्याचा पाडा येथील या दोघी मंगळवारपासून बेपत्ता होत्या. दोन्ही मुलींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शनिवारी जंगलात सापडले. या दोन्ही मुलींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : आईने जेवण बनविण्यास सांगूनही ते न बनवल्याने चिडलेली आई मैत्रिणीसमोर रागावली. हा राग मनात धरून मनीषा धापटे (१६) या मुलीने व तिची मैत्रीण शोभा धापटे (१६) या दोघींनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या दोघींचे मृतदेह शनिवारी कसाऱ्याजवळील जंगलात सापडले.
कसारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पेठ्याचा पाडा येथील या दोघी मंगळवारपासून बेपत्ता होत्या. दोन्ही मुलींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शनिवारी जंगलात सापडले. या दोन्ही मुलींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी मनीषा हिला तिच्या आईने सकाळी शेतावर जात असताना तू घरीच थांबून दुपारचे जेवण बनवून ठेवायला सांगून तिचे आईवडील शेतावर निघून गेले. नंतर मनीषा तिच्या शोभा या मैत्रिणीच्या घरी गेली व तिथे खेळत बसली. दुपारी मनीषाची आई शेतावरून घरी डबा घ्यायला आली असता मनीषाने घरात काहीही बनवले नसल्याचे लक्षात आले. मनीषाही नसल्याने ती मैत्रिणीकडे गेल्याचे समजले. मनीषाची आई शोभा हिच्या घरी गेली व तिथे मनीषाला जेवण बनवले नाही म्हणून ओरडली व पुन्हा शेतावर निघून गेली.
आई मैत्रिणीसमोर ओरडली म्हणून मनीषा रागात घरी गेली व दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडली. मनीषाच्या पाठोपाठ शोभाही घराबाहेर पडली. मंगळवारी दुपारपासून मनीषा, शोभा बेपत्ता झाल्या. मुली घरी न आल्याने दोन्ही कुटुंबांनी शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत.
शेवटी स्थानिक ग्रामस्थ व धापटे कुटुंबातील लोकांनी उंबरमाळी, फणसपाडाजवळच्या डोंगरावर शोध सुरू केला असता तिथे मनीषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सकाळी ९ वाजता सापडला. याची माहिती कसारा पोलिसांना कळवली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, संकेत देवळेकर दाखल झाले. मनीषाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी शोभाचा शोध सुरू केला असता ५०० मीटरच्या अंतरावर शोभाचा मृतदेह दुपारी चार वाजता आढळला. दोन्ही तरुणींनी विषारी औषध प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
जीवाभावाच्या होत्या मैत्रिणी
मनीषा व शोभा या जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. दररोज एकत्र जेवणार, एक बिस्कीट असेल तरी अर्धे खायच्या असे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी भर पावसात तब्बल सहा तास स्थानिक तरुणांना सोबत घेऊन डोंगर, रेल्वेमार्गादरम्यान शोध घेतला.