बापाच्या अय्याशीमुळे चिमुरडीचा बळी; कर्जाच्या ओझ्यामुळे उचलले पाऊल, कुटुंब उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 01:12 PM2022-06-17T13:12:08+5:302022-06-17T13:12:32+5:30
बापाच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य करत एक हसरा खेळता जीव घेतानाच त्याने व त्याच्या पत्नीने स्वतःचे कुटुंबच उद्ध्वस्त केले.
मीरा भाईंदर :
वसईचा स्टिफन ब्राको (वय ३७) आणि पूनम (वय ३०) हे सुशिक्षित दाम्पत्य. त्यांची मुलगी अनायका (वय ७) ही गोडगोजिरी व कोणालाही लळा लावेल अशी; पण डान्स बार, ऑर्केस्ट्रा बारसह अय्याशीच्या व्यसनात बेधुंद बुडालेल्या स्टिफनने कर्जाच्या ओझ्याखाली पोटच्या मुलीची हत्या केली. बापाच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य करत एक हसरा खेळता जीव घेतानाच त्याने व त्याच्या पत्नीने स्वतःचे कुटुंबच उद्ध्वस्त केले.
३० मे रोजीच्या दुपारी २ वाजता काशीमीरा पोलिसांना सिझन लॉजमधून फोन आली की, खोलीतील एक महिला ‘वाचवा, वाचवा’ म्हणून ओरडत होती. डुप्लिकेट चावीने दार उघडले असता ती बेशुद्ध अवस्थेत होती. तर, तिची मुलगी निपचित पडलेली होती व तोंडातून रक्त येत होते, डोळे बाहेर आले होते. तिचा बाप सकाळीच निघून गेला होता. सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन पोतदार हे पथकासह घटनास्थळी दाखल होताच त्यांना हे प्रकरण गंभीर असल्याचे समजले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली असता त्यातील डॉक्टरांनी अनायकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर, पूनम हिला भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. पोतदार यांनी वरिष्ठांना कळवताच सहायक पोलीस आयुक्त विलास सानप, काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे आदी घटनास्थळी दाखल झाले.
२७ मे रोजी स्टिफन, पूनम, अनायका लॉजमध्ये राहायला आले. संपूर्ण कुटुंब असल्याने लॉजवाल्यांनाही संशय आला नाही. ३० मे रोजी स्टिफन सकाळी १०.३० वाजता निघून गेला. अत्यवस्थ असलेल्या पूनमकडून थोडीफार माहिती पोलिसांना मिळाली. लॉजमधील तिघांच्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. मग पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. ३१ मे रोजी स्टिफन मीरा रोड स्थानकासमोरील एका लॉजमध्येच सापडला. पूनम आणि स्टिफन यांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.