बॅण्ड स्टँडवरून दिवसाढवळ्या ‘ती’ मुलगी गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 06:35 AM2021-12-14T06:35:43+5:302021-12-14T06:36:07+5:30
१५ दिवस झाले तरीही पोलिसांना सापडेना
मनीषा म्हात्रे
परीक्षेसाठी घराबाहेर पडलेली बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी वांद्रे बॅण्ड स्टॅंडवरून दिवसाढवळ्या गायब झाल्याच्या घटनेला १५ दिवस उलटले आहेत. तपासासाठी वांद्रे पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली; पण स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांच्या हाती अद्याप काहीही लागलेले नाही. मुलीचे आईवडील मात्र यामुळे हवालदिल झाले आहेत.
बोईसर परिसरात कुटुंबीयांसोबत राहणारी स्वदिच्छा मनीष साने ही २२ वर्षीय तरुणी सर जे. जे. रुग्णालयातील ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता पेपर असल्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास ती घराबाहेर पडली. दुपारी साडेबाराच्या सुमारास चुकीची लोकल पकडल्यामुळे अंधेरीत उतरल्याचे तिने आत्याला फोन करून सांगितले. तोच तिचा शेवटचा कॉल ठरला.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिच्या मैत्रिणीने, स्वदिच्छा ही परीक्षेला तसेच हॉस्टेललाही आली नसल्याचे सांगितले. ते ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. घरातील प्रत्येकजण तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, संपर्क झाला नाही. अखेर भाऊ संस्कारने बोईसर पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला. पोलीस तपासात त्याच दिवशी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी स्वदिच्छा बॅण्ड स्टँड येथील समुद्रकिनारी जाताना दिसल्याचे उघड झाले. त्यानंतर मात्र ती तेथून बाहेर पडताना दिसली नाही. ही तरुणी तेथे का गेली होती, याचेही गूढच आहे. त्यानुसार बोईसर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवत पुढील तपासासाठी वांद्रे पोलिसांकडे वर्ग केला. वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत आहेत. तिच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी सुरू आहे, तसेच तिच्या मोबाईल तपशिलाच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
रात्री तीन वाजता तेथील जीवरक्षकासोबतचा तिचा एक सेल्फीही समोर आला आहे. त्याच्या चौकशीतून तरुणी पहाटेपर्यंत तेथेच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी जीवरक्षकाचा मोबाईल ताब्यात घेतला आहे.
स्वदिच्छाचा तपास सुरू
स्वदिच्छाच्या शोधासाठी विविध पथके तैनात असून, अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी तिला अखेरचे पाहिलेल्या जीवरक्षकाचा जबाबही नोंंदविण्यात आला आहे.
- मनोहर धनावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वांद्रे पोलीस ठाणे
अपहरणाचा संशय
स्वदिच्छा अभ्यासात हुशार आहे. ती हॉस्टेलमध्येच राहायची. दिवाळीच्या सुटीनिमित्ताने ती महिनाभरापूर्वी घरी आली होती. तिच्याकडील किमती ऐवज चोरी करण्याच्या हेतूने तिचे अपहरण करण्यात आल्याचा संशय आहे. पोलिसांनी तिचा लवकरात लवकर शोध घेणे गरजेचे आहे.
- संस्कार साने, स्वदिच्छाचा भाऊ