मनाविरोधात लग्न केले म्हणून माहेरच्यांनीच केले अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 06:52 AM2021-07-16T06:52:06+5:302021-07-16T06:52:36+5:30
दहिसर पोलिसांनी पुणे-साताऱ्यातून चौघांना पकडले.
घरच्यांच्या मनाविरोधात लग्न केले म्हणून लेकीचे अपहरण करण्याचा प्रकार दहिसरमध्ये गुरुवारी उघडकीस आला. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच ही घटना जरी असली तरी त्या ‘रिअल लाईफ’च्या अपहरणकर्त्यांना अवघ्या चोवीस तासांत दहिसर पोलिसांनी पुणे आणि साताऱ्यातून पकडले. ज्यात अपह्रत मुलीची आई आणि मावशी व होणाऱ्या नवऱ्याचा समावेश आहे. आई कोइल अम्माल देवेंद्र (४६), मावशी पोंनु ताई (४३), नातेवाईक नाडार स्वामी (३०) आणि चालक अरुण कुमार देवेंद्र (२६) अशी या अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
दहिसर पोलीस ठाण्यात बुधवारी पॉलसिंह नाडार (३५) नामक व्यक्तीने त्याच्या पत्नीचे एसव्ही रोडच्या सम्मेलन हॉटेलजवळून नातेवाईकांकडून अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दहिसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिनव पवार, पोलीस उपनिरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे आणि पथक यांनी तातडीने याप्रकरणी तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यात फारशी माहिती हाती न लागल्याने कोइलच्या मोबाइल क्रमांकाचे लोकेशन शोधण्यात आले. त्याच ठिकाणी अपहरणकर्त्यांनी वापरलेली गाडी देखील असल्याचे पोलिसांना समजले.
मुंबई-पुणे महामार्गावरच दहिसर पोलिसांनी चालक अरुणकुमार तर साताऱ्यात गाडी थांबवत अन्य तिघांना अटक केली. कोइल यांच्या मुलीने २०१९ मध्ये घरच्यांच्या मनाविरोधात लग्न केले होते. जे त्यांना मंजूर नव्हते. त्यामुळे हा प्रकार केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
दुसरे लग्न लावण्यासाठी रचला होता डाव
दहिसर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी लावत त्या वर्णनाचे लोक दिसल्यास गाडी अडविण्यास सांगितले. विवाहित मुलीला साताऱ्याला नेऊन तिचे अरुणकुमार सोबत लग्न लावण्याचे तिच्या आईने ठरवले होते. यासाठी तिने हा अपहरणाचा डाव रचला होता.