फळविक्रेत्या मुलीवर अत्याचार; तरुणी ५ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर फुटलं बिंग, वसईतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 06:54 PM2021-10-14T18:54:55+5:302021-10-14T18:55:16+5:30
आरोपीला तेलंगणा (हैदराबाद) येथुन घेतलं ताब्यात
- आशिष राणे
वसई- वसई रोड रेल्वे स्थानकात हमाली करणाऱ्या तरुणाने एका (२१) वर्षे तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पळालेल्या आरोपीला वसई रोड लोहमार्ग पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या आरोपींला वसई रोड लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने तीन महिन्यांच्या अथक परिश्रमाने थेट तेलंगणा (हैदराबाद ) राज्यांतून वरून ताब्यात घेतले आहे. शेष प्रसाद उर्फ दीपू हिरालाल पांडये (२८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेष प्रसाद हा वसई रोड रेल्वे स्टेशन परिसरात हमालीचे काम करत होता. दरम्यानच्या काळात ( डिसेंबर २०२० ) त्याची एका (२१) वर्षीय फळविक्रेती तरूणी सोबत ओळख झाली होती आणि त्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झालं होतं.अधून मधूनच्या भेटीत हमालाने तिला लग्नाचे आमिष दाखवून सतत तिचे लैंगिक शोषण केलं होतं. मात्र हे सर्व सुरु असताना अखेरीस ती तरुणी ५ महिन्यांची गरोदर माता असल्याचं उघड झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. दरम्यान या प्रकाराने हादरून गेलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी वसई रोड लोहमार्ग पोलिस ठाणे गाठलं आणि पोलिसांना सर्व हकीकत कथन केल्यावर रेल्वे पोलिसांनी दि. २६ जुलै २०२१ रोजी आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.
परिणामी गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर आरोपी शेष प्रसाद फरार झाला होता. मात्र तरीही रेल्वे पोलिस आरोपीचा शोध घेतच होते तो सातत्याने त्याचे ठिकाण व मोबाईल नंबर बदली करायचा मात्र शेवटी मागील आठवड्यात रेल्वे पोलिसांना आरोपी शेष प्रसाद हा त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती प्राप्त झाली होती. मात्र आरोपींला तिथे ही वसई रोड रेल्वे पोलिसांची कुणकुण लागताच तिथून ही तो फरार होऊन दुसऱ्या राज्यात जाण्यास यशस्वी झाला होता. परंतु पुन्हा रेल्वे पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेत आणि आपल्या गुप्त बातमीदारा मार्फत तांत्रिक सहाय्य व वेषांतर करून आरोपीच्या दुसऱ्या मोबाईलचे लोकेशन शोधून अखेर त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि चार दिवसांपूर्वी त्याला तेलंगणा (हैदराबाद) शहरातुन त्याच्या मुसक्या आवळल्याचे पोलिसांनी सांगितले. वसई रोड लोहमार्ग पोलिस आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या उत्तम कामगिरीमुळे सर्वत्र पोलिसांचे कौतुक केलं जातं आहे.
आरोपीला पोलीस कोठडी
रेल्वे पोलिस आरोपींला वसईत घेऊन आले असता आरोपींला कोर्टात हजर केल्यावर त्यास दि. १६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.