प्रियकरासोबत युवती पळाली, हेडकॉन्स्टेबलनं पोलीस चौकीत आणून केला बलात्कार; जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 04:28 PM2021-09-06T16:28:13+5:302021-09-06T16:30:16+5:30
पीडित युवती प्रियकरासोबत दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात पोहचली तेव्हा तिला पैशाचं आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला.
सीकर – शहरात पोलीस दलाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रियकरासोबत घरातून पळालेल्या दलित युवतीला पुन्हा परत घेऊन येताना पोलीस चौकीचा प्रभारी तिची छेड काढत होता. त्यानंतर जबाब नोंदवण्याच्या बहाण्याने चौकीतच त्याने युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर युवतीला धमकावून तिला युवकासोबत पाठवून दिले. ही घटना २९ ऑगस्ट रोजी घडली आहे.
पीडित युवती प्रियकरासोबत दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात पोहचली तेव्हा तिला पैशाचं आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. अखेर त्या दोघांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. तात्काळ या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले. तसेच हेडकॉन्स्टेबल या पोलीस स्टेशनमधून निलंबित करण्याचे आदेशही उपअधीक्षक राजेश आर्य यांनी दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
सीकर जिल्ह्यातील युवती १२ ऑगस्टला घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलीस तपासात आढळलं की, युवती तिच्या प्रियकरासोबत श्रीगंगानगर जिल्ह्यात गेली आहे. सिंगरावट पोलीस स्टेशनचे प्रभारी हेडकॉन्स्टेबल सुभाष कुमार हे युवती आणि तिच्या प्रियकराला पुन्हा परत आणण्यासाठी गेले. तेव्हा सुभाषने प्रियकराला गाडीत पुढे बसवले आणि स्वत: युवतीसोबत मागे बसला. रस्त्यात पोलिसाने युवतीची छेड काढली. युवतीने त्याचा विरोध केल्यानंतर गाडीतच तिला मारहाण करण्यात आली. २९ ऑगस्टला साडे चार वाजता हे सर्वजण पोलीस स्टेशनला पोहचले. सुभाष कुमारने प्रियकराला बाहेर पाठवलं आणि स्वत: जबाब नोंदवण्याच्या बहाण्याने युवतीला आतमध्ये घेऊन गेला. चौकीतच तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तिला धमकावून प्रियकरासोबत पाठवण्यात आले.
आरोपी पोलिसावर कारवाई करण्याची मागणी
युवतीने घडलेला प्रकार प्रियकर आणि कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांना सांगितला. दुसऱ्या दिवशी दोघंही तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा सगळे हैराण झाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रकरण दडपण्यासाठी पंचायत बसवली. यावर युवतीचे भाऊ-वहिणी तिथे पोहचले. तक्रार नोंदवून नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव आणला. परंतु युवती आणि तिच्या प्रियकराने थेट पोलीस अधीक्षकांकडे हे प्रकरण नेले. पोलीस अधीक्षकांनी उपअधीक्षक राजेश आर्य़ यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर रविवारी संध्याकाळी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.