गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या मुलीचा बसमध्ये मृत्यू; विचित्र घटनेमुळे पोलीस हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 12:07 PM2022-11-29T12:07:19+5:302022-11-29T12:08:00+5:30
तमिना आणि तिचा मित्र सचिन किट्टू दोघेही २४ तारखेला रात्री १० च्या सुमारास म्हापुसा येथून बसमध्ये बसले
नवी मुंबई - गोव्याहून मुंबईला परतणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा बसमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. ही तरुणी मालाडची असून रविवारी ती गोव्याहून मुंबईला बसने प्रवास करत होती. तमिना आलीम असं या तरूणीचं नाव असून अलीकडेच तिचा गोव्यामध्ये बाईक अपघात झाला होता. बसमध्ये तमिनाचा श्वास थांबल्यानं तिच्या मित्राने बस थांबवायला सांगितली. मात्र त्यावरून चालक वाहकानं मारहाण केल्यानं हे प्रकरण रहस्यमय बनलं.
नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी वाहनचालक आणि एकाला ताब्यात घेतले आहे. २२ वर्षीय तरुणी मालाडच्या मालवणी भागात राहत होती. तमिना गोव्यातील बागा बीचजवळील बारमध्ये काम करायची. शुक्रवारी ती दुचाकीवरून अपघात झाल्याने जखमी झाली होती. तेव्हा आईने तिला मुंबईला यायला सांगितले. तमिनाच्या आईनं म्हटलं की, माझी मुलगी दहावीपर्यंत मालवणीत शिकली. ६-७ महिन्यापूर्वी ती गोव्याला शिफ्ट झाली होती. शुक्रवारी तिने मला फोन करून तिचा अपघात झाल्याचं कळवलं. तेव्हा मी तिला घरी येण्यास सांगितले. तमिना आणि तिचा मित्र सचिन किट्टू दोघेही २४ तारखेला रात्री १० च्या सुमारास म्हापुसा येथून बसमध्ये बसले असं तिने सांगितले.
तर तमिना काही खात नव्हती, तिच्या पोटात दुखत असल्याचं म्हणत होती. रविवारी सकाळी ८.५० च्या सुमारास सातारा येथील एका हॉटेलवर ट्रॅव्हल्स थांबली. तेव्हा सचिन चहा घेण्यासाठी खाली उतरला. त्यानंतर जेव्हा तो बसमध्ये परत आला तेव्हा बस क्लिनर योगेश तमिनाला सीपीआर देताना दिसला. तिला श्वास घेता येत नव्हता. मी योगेशला तातडीने जवळच्या हॉस्पिटलला गाडी नेण्याची विनंती केली तेव्हा त्याने मला ड्रायव्हरच्या केबिनच्या दिशेने ढकललं आणि तिथे बसण्यास भाग पाडले. त्यांनी माझ्यावरच आरोप करत आता पोलीस स्टेशनला जाऊ असं म्हटलं. त्यानंतर गाडी पुढे चालली नेरुळ इथे पोहचल्यावर एका पोलीस चौकीजवळ थांबलो तेव्हा तमिना आणि मला एनएमएमसी रुग्णालयात नेले. तिथे तमिनाला मृत घोषित करण्यात आले असं तमिनासोबत प्रवास करणारा मित्र सचिनने सांगितले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तमिनाच्या मृत्यूची अपघाती नोंद घेतली आहे. परंतु तिच्या मित्राने जे काही सांगितले आणि बसमधील इतर कुणीही यावर आक्षेप घेतला नाही हे विचित्र आहे. सध्या आम्ही या प्रकरणी सर्व अँगलने तपास करत आहोत. जर दुचाकी अपघातात मुलीला दुखापत झाली असेल तर तिला गोव्यातील कोणत्या डॉक्टरकडे नेले आणि तिथे काय उपचार केले गेले याची माहिती घेतली जात आहे. सोमवारी आलेल्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये मुलीच्या मृत्यूचे कारण डोक्याला दुखापत असल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे या मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्याचं आव्हान नेरुळ पोलिसांसमोर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"