तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले अन् दोन लाख रुपये उकळले... लग्नाचा विषय काढताच तरुणाने फिरवली पाठ!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 03:56 PM2024-01-08T15:56:17+5:302024-01-08T15:57:11+5:30
तरुणाने नोकरीच्या बहाण्याने तरुणीची दोन लाख रुपयांची फसवणूक केली. यानंतर तो फरार झाला.
उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातील प्रयागराजमध्ये एका तरुणाकडून तरुणीची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून तरुणीला प्रेमाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नाही तर तरुणाने नोकरीच्या बहाण्याने तरुणीची दोन लाख रुपयांची फसवणूक केली. यानंतर तो फरार झाला. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज जिल्ह्यातील सोरावन भागात राहणाऱ्या एका तरुणीने सांगितले की, ती काही महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून या तरुणाच्या संपर्कात आली होती. दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. आरोपी तरुण हा सैनी कोतवालीच्या बारीपूर शाखेचा रहिवासी आहे. मैत्रीनंतर दोघांमध्ये अफेअर सुरू झाले.
आरोपीने स्वत:च्या नोकरीसाठी दोन लाख रुपये लागतील, असे सांगितले होते. त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते कारण त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे तरुणीने त्याला भेटून दोन लाख रुपये दिले होते, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यानंतर तरुण सतत तरुणीला भेटू लागला. दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले. मात्र तरुणीने तरुणाला लग्नासाठी विचारले असता त्याने स्पष्ट नकार दिला.
या घटनेनंतर तरुणीलाही कळले की, तो तरुण तिच्याशी खोटे बोलत होता. तसेच, त्याचे नाव मयंक पटेल नसून संदीप यादव आहे. त्यानंतर तरुणीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार संदीप यादवला समजताच तो पळून गेला. मात्र पोलिसांनी लवकरच त्याचा शोध घेतला आणि अटक केली. एएसपी अशोक कुमार वर्मा यांनी सांगितले की, आरोपीला न्यायालयात हजर केले असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.