नाशिकमध्ये भरधाव टेम्पोने बालिकेला चिरडले; संतप्त जमावाकडून दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 07:26 PM2023-05-02T19:26:39+5:302023-05-02T19:27:20+5:30
बालिकेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...
संदीप झिरवाळ -
नाशिक : आईसोबत किराणा दुकानात जाणाऱ्या एका आठ वर्षीय बालिकेला भरधाव टेम्पोने धडक दिली. या धडकेत जोया सलीम शेख (८,रा.अवधूतवाडी) या बालिकेचा मृत्यू झाला. घटनेनंतर जमलेल्या संतप्त जमावाने टेम्पोवर दगडफेक करत तोडफोड केली. यामुळे परिसरात तणावाची स्थिती पसरल्याने पंचवटी, म्हसरूळ पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बालिकेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिंडोरी रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ गजानन चौकातून सोमवारी (दि.१) सायंकाळी सहा वाजता जोया ही त्याची आई शबनमसोबत रस्ता ओलांडत होती. याचवेळी पंचवटीकडून म्हसरूळकडे भरधाव जाणारा टेम्पोने (एमएच१५-एचएच ४८५८) जोयाला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चिमुकली टेम्पोच्या चाकाखाली सापडून चिरडली गेली. तसेच त्याच ठिकाणाहून रस्ता ओलांडत असलेला मोहसिन मोहम्मद इस्लाम हा मुलगाही जखमी झाला. यावेळी पाटाजवळील वज्रेश्वरीनगर परिसरातील लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले. अपघातग्रस्त टेम्पोला घेराव घालत दगडफेक करून टेम्पोची तोडफोड केली. परिसरातील संतप्त जमावामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
या रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबळी होती. अपघाताच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी जमाव पांगवत टेम्पोचालक रुस्तम दत्तात्रय टेंगसे (रा.हिरावाडी) याला अटक केली. जोयाची आई फिर्यादी शबनम फिरोज खान (२०,रा.अवधूतवाडी) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालक संशयित रुस्तम टेंगसेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहायक निरीक्षक पडोळकर हे करीत आहेत.
टेम्पो पोलिस ठाण्यात -
जमलेल्या जमावाने मालवाहू वाहनावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवत रस्ता वाहतुकीला मोकळा करून दिला. तसेच अपघातग्रस्त मालवाहू टेम्पो पोलिस ठाण्यात जमा केला आहे. यावेळी चालकाला काही नागरिकांनी रागाच्या भरात मारहाण करण्याचाही प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.