भिवंडीतून पाच वर्षांपूर्वी अपहृत झालेली मुलगी मिळाली ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 09:28 PM2021-10-18T21:28:08+5:302021-10-18T21:28:19+5:30
मर्जीनेच लग्न केल्याचा दावा : गुजरातमधून आली होती नातलगांना भेटायला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पाच वर्षांपूर्वी भिवंडीतून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या कक्षाला सोमवारी दुपारी यश आले. मर्जीनेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह केल्याचाही दावा तिने चौकशीमध्ये पोलिसांकडे केला.
भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०१७ रोजी तत्कालीन १७ वर्षांच्या या मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ९ मार्च २०२१ रोजी म्हणजे पाच वर्षांनी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविले होते. हाच तपास १८ जून २०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग झाला. दरम्यान, हीच मुलगी ठाण्यातील मासुंदा तलाव येथे काही कामानिमित्त येणार असल्याची टीप पोलीस उपनिरीक्षक भगवान औटी यांना मिळाली. त्या आधारे १८ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका लहान बाळासह मासुंदा तलाव परिसरात ती उभी असताना या पथकाने तिला ताब्यात घेतले. तेव्हा गुजरात येथून ठाण्यातील नातेवाइकांना भेटायला आल्याचे तिने सांगितले.
सध्या ती २२ वर्षांची असून, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर गुजरात येथील एका तरुणाबरोबर मर्जीने विवाह केला. तिला सध्या तीन वर्षांचा मुलगाही असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची खातरजमा करून तिला तिच्या पतीच्या ताब्यात दिल्याचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले.