प्रियकरासोबत पळून गेली होती प्रेयसी, बदनाम झाला बिचारा वाघ; जाणून घ्या काय आहे भानगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:37 IST2022-07-27T13:36:46+5:302022-07-27T13:37:15+5:30
यूपीच्या बहराइचमधील अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एका तरूणीच्या प्रेमापाई एक वाघ बदनाम झाला. कारण प्रेयसी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली तर वाघ बदनाम झाला.

प्रियकरासोबत पळून गेली होती प्रेयसी, बदनाम झाला बिचारा वाघ; जाणून घ्या काय आहे भानगड
बऱ्याचदा असं होतं की, गुन्हा दुसरंच कुणी करतं आणि बदनाम वेगळंच कुणीतरी होतं. उत्तर प्रदेशातील अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. इथे एका तरूणीमुळे जंगलातील वाघ बदनाम झाला. असं म्हणतात की, प्रेमात लोक आंधळे होतात आणि कुणाचातरी आधार घेऊन प्रेम मिळवतात. यूपीच्या (Uttar Pradesh) बहराइचमधील अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एका तरूणीच्या प्रेमापाई एक वाघ बदनाम झाला. कारण प्रेयसी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली तर वाघ बदनाम झाला.
ही घटना सुजौली गावात राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरूणीची आहे. बऱ्याच महिन्यांपासून तिचं गावात राहणाऱ्या एका तरूणासोबत अफेअर सुरू होतं. दोघांनी पळून जाण्याचा प्लान केला. सायंकाळी अंधार पडल्यावर त्यांनी भेटण्याचा प्लान केला आणि दोघेही पळून गेले. तरूणी शनिवारी रात्री पाणी आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली आणि तिथूनच प्रियकरासोबत पळून गेली. पण तिच्या आईने पोलिसांना सांगितलं की, तिच्या मुलीला वाघ उचलून घेऊन गेला.
तरूणीच्या आईच्या जबाबावरून पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी त्यांच्या टीमसोबत जंगलात सर्च ऑपरेशन करू लागले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत तरूणीचा काही पत्ता लागला नाही तर पोलिसांनी दुसऱ्या दृष्टीने तपास सुरू केला. पोलिसांनी गावातील लोकांकडून तरूणीची माहिती काढली. त्याच गावातून गायब झालेल्या तरूणाचा मोबाइल सर्व्हिलांवर टाकला.
यानंतर पोलिसांना सगळ्या प्रकरणाचा खुलासा झला. पोलिसांनी तरूणी आणि तिच्या प्रियकराला चार लोकांसोबत अटक केली. पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीवरून प्रियकरासहीत 3 लोकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रियकरासहीत तीन लोकांना अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे.