प्रेयसीकडून प्रियकराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, व्हॅलंटाईन वीकमध्ये घडली संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 05:51 PM2022-02-11T17:51:00+5:302022-02-11T17:53:58+5:30
Crime News : लोहोणेरमधील घटना; प्रेम प्रकरणातून वाद, गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक जिल्ह्यात अगोदरच गुन्हेगारीने कळस गाठला असतानाच देवळा तालुक्यात एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. लोहोनेर येथील एका तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रेम प्रकरणातून वाद होऊन संबंधित प्रेयसीनेच प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.११) दुपारी देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात घडला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी युवतीसह कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील प्लंबिंग व्यवसाय करणारा युवक गोरख काशीनाथ बच्छाव याची तीन वर्षांपासून रावळगाव येथील एका युवतीशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने गोरखकडून लग्नाची मागणी होऊ लागली. मात्र, युवतीच्या कुटुंबीयांकडून त्यास विरोध होता. यातून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली. सदर वाद मिटावेत म्हणून समझोता करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी साडेअकराच्या वाजेच्या सुमारास युवतीचे कुटुंबीय लोहोणेर येथे दाखल झाले. मात्र, बैठकीत योग्य तोडगा न निघाल्याने वाद वाढत गेला. यावेळी युवतीच्या कुटुंबीयांकडून गोरख यास मारहाण करण्यात आली. सदर वाद काही ग्रामस्थांनी मिटविण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी गोरख यास लोखंडी रॉड व काठीने मारहाण करण्यात आल्याने गोरख हा स्वतःच्या बचावासाठी येथील ओमसाई मोबाईल शॉपी या दुकानात घुसला. यावेळी युवतीने त्याच्या अंगावर माचीसची काडी फेकल्याने गोरख सोनवणे हा सुमारे ३५ टक्के भाजला असून त्यास तातडीने पुढील उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. बघ्यांनी मात्र घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
एकीकडे व्हॅलेंटाईन वीक सुरु असताना या घटनेने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर येथील ही घटना आहे. लोहोणेर येथील दोघांचे प्रेम प्रकरण होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याच दरम्यान मुलीला स्थळे दाखविण्याचे काम चालू होते. मात्र, सदर मुलामुळे ही स्थळे मोडली जात असल्याचे मुलीच्या घरच्यांचे म्हणणे होते. लग्न मोडल्याने मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या घटनेत युवक गंभीर भाजला असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. यानंतर संबंधित युवकाला देवळा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. युवक ३५ टक्के भाजला असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनि सांगितले आहे. या प्रकरणी देवलळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वॉर्डबॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी अन् मारलं ठार, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह
पोलिसांनी संशयितांना घेतले ताब्यात
याबाबत पोलिसांनी कल्याणी गोकुळ सोनवणे ( वय २३ ), गोकुळ तोंगल सोनवणे (वय ५७ ), निर्मला गोकुळ सोनवणे (वय ५२), हेमंत गोकुळ सोनवणे (वय ३०), प्रसाद गोकुळ सोनवणे, सर्व रा. बी. सेक्शन, रावळगाव यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत निकम हे पुढील तपास करीत आहेत.