६० हजार रुपयांसाठी मुलींना पुन्हा ढकलले वेश्याव्यवसायात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:25 AM2019-07-11T06:25:44+5:302019-07-11T06:26:32+5:30

तिसरा आरोपी अटकेत; निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताचे नाव पुढे; नोकरीच्या आमिषाने केली फसवणूक

Girls again for prostitution for 60 thousand rupees! | ६० हजार रुपयांसाठी मुलींना पुन्हा ढकलले वेश्याव्यवसायात!

६० हजार रुपयांसाठी मुलींना पुन्हा ढकलले वेश्याव्यवसायात!

Next

मनीषा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अवघ्या ६० हजार रुपयांसाठी वेश्याव्यवसायातून सुटका केलेल्या तीन मुलींना पुन्हा वेश्याव्यवसायात ढकलल्याची धक्कादायक माहिती नागपाड्याच्या प्रकरणातून समोर येत आहे. बुधवारी या प्रकरणात नव्याने अटक केलेल्या गजानज थोरात उर्फ गजीया याच्या चौकशीतून ही बाब उघड झाली आहे. यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्त आर. छजलानी याचेही नाव पुढे आल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


या प्रकरणात अटक केलेल्या रवींद्र राजनारायण पांडे उर्फ डब्बा पांडे याच्यासह थोरात याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेला निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलंदर शेख (६८) हा जे.जे. रुग्णालयात दाखल झाल्याने, तो गैरहजर होता. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिराज शेखलाही या प्रकरणात आरोपी दाखविण्यात आले आहेत.


तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून या तिन्ही मुलींना पश्चिम बंगालमधून मुंबईत आणले. मुंबईतील कामाठीपुरामध्ये त्यांना विकले. एका खोलीत डांबून त्यांना वेश्याव्यवसायात अडकविण्यात आले. ११ मार्च, २००४ रोजी रेस्क्यू फाउंडेशनच्या मदतीने या ठिकाणांहून तीन अल्पवयीन मुलींसह ६ जणींची सुटका करण्यात आली.


१२ मार्च रोजी या तिन्ही मुलींना बालकल्याण समितीसमोर उभे करणे गरजेचे होते. मात्र, त्यांना चेंबूरच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले. त्यावेळी संस्थेने याबाबत जाब विचारला. शेख यांनी, १५ मार्च रोजी समितीसमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, १३ मार्च रोजीच शेखच्या आदेशाने तिघींना बालसुधारगृहातून नागपाड्यात परिसरात आणून, पुन्हा कुंटणखाण्यात पाठविल्याची माहिती तपासात समोर आली. स्टेशन डायरीत मात्र, मुलींना नातेवाइकांच्या ताब्यात दिल्याचे नमूद करण्यात आले. महिन्याभराने, १ एप्रिलला त्या पुन्हा तेथे आल्याचे समजताच रेस्क्यू फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांची सुटका केली होती. त्यांना पश्चिम बंगालमध्ये सोडण्यात आले. तमंग विरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई केली.


या प्रकरणात गजिया याने तमंगकडून ६० हजार रुपये घेतल्याची माहिती समोर आली. गजिया हा तमंगसाठी काम करायचा. पांडे हा दलाल म्हणून काम सांभाळत असल्याचे समोर आले. गजियाकडे या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहेत. मात्र, यात शेख आणि पांडेला पैसे मिळाले? याबाबत अधिक तपास सुरू आहे. यात, शेख आणि गजियाला १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहेत, तर शेखला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


कलंदर शेख रुग्णालयात
औरंगाबादचा रहिवासी असलेल्या निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक कलंदर शेख (६८) याची मंगळवारी अचानक तब्येत खालावल्याने त्याला नायरमध्ये दाखल करण्यात आले. तेथून त्याला जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, तसेच त्याच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यास सांगण्यात आले आहेत. २००० मध्ये त्यांची बायपास सर्जरी करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. जमाल खान यांनी दिली. ते गैरहजर असल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
शेख म्हणे एसीपींच्या आदेशाने पालन...
शेखच्या जबाबानुसार, १२ मार्च, २००४ रोजी एसीपी छजलाणी हे आले असताना, पांडेही तेथे आला होता. तो समाजसेवक असल्याने त्याला ओळखतो. त्याने, माझ्यासमोरच छजलाणी यांना तिन्ही मुली अल्पवयीन नसून, त्यात एक अर्धांगवायूमुळे आजारी असल्याचे सांगून त्यांना सोडण्यात यावे, असे सांगितले होते, तेव्हा छजलाणी यांनीच तिन्ही मुलींना सोडून देण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक सोनावणेला याबाबत सांगितले. आपण स्वत: मुलींची कधीच चौकशी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, स्वत:च्या बचावासाठी शेख आपल्यावर खोटे आरोप करत असल्याचे छजलाणी यांनी जबाबात सांगितले आहे.

मुलीला चटके
पुन्हा वेश्याव्यसायात ढकलल्यामुळे तिघींनी कुंटणखाना चालक मीरा तमंग हिला नकार दिला. तमंग हिचा नवरादेखील यात, परत कुंटणखान्यात आलेल्या मुलींना त्रास देत होता. तिघींपैकी एका मुलीला लहान मुलगी होती. वेश्याव्यसाय करावा म्हणून, तमंग तिला चटके देत होती. अखेर, चिमुकलीचे घाव बघून या मुली मनाविरुद्ध वेश्याव्यवसाय करत होत्या.

Web Title: Girls again for prostitution for 60 thousand rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.