बंद खोलीत आढळला मुलीचा मृतदेह; १ डिसेंबरपासून होती बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 09:01 AM2023-12-05T09:01:09+5:302023-12-05T09:01:13+5:30
नालासोपाऱ्यातून आठ वर्षीय बालिका १ डिसेंबरपासून होती बेपत्ता
नालासोपारा : शहरात आठ वर्षीय बालिकेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी तिचा मृतदेह घराजवळील एका बैठ्या चाळीतील बंद खोलीत प्लास्टिकच्या गोणीमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. चांदणी साह असे तिचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून ती घराजवळून बेपत्ता झाली होती.
वसई फाटा येथील वाण्याचा पाडा भागात जिल्हा परिषद शाळेजवळ राहणाऱ्या विजय रामायण साह यांची मुलगी चांदणी साह हिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत तिचे वडील विजय साह यांनी पेल्हार पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. परिसरात चांदणीच्या फोटोचे पोस्टर लावून तिचा सर्वत्र शोध सुरू होता. सोमवारी सकाळी चांदणी राहत असलेल्या घराजवळील बैठ्या चाळीतील पाच नंबर खोलीतून कुजल्याचा वास येत असल्याने स्थानिकांनी रूमचे दार उघडले. तेव्हा आतमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत प्लास्टिकच्या गोणीमध्ये कोंबलेला तिचा मृतदेह आढळून आला. पेल्हार पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून विच्छेदनासाठी तो मुंबईला पाठविला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत चांदणी ही घराजवळच्या मराठी शाळेत तिसरीत शिकत होती. या बालिकेची हत्या कोणी आणि का केली, याचा पोलिस शोध घेत आहेत.