मुलींचा फेक ID, Video कॉल, ब्लॅकमेलिंग अन्...; सरकारी वेबसाईट करायचे हॅक, झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 03:06 PM2024-04-10T15:06:55+5:302024-04-10T15:08:05+5:30

सायबर फसवणूक करणारी टोळी पकडण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून आधार कार्ड, लॅपटॉप, मोबाईल, चेकबुक, पासपोर्ट, पासबुक, डेबिट कार्डसह बाईक, स्कूटर जप्त केली आहे.

girls fake id video calls and blackmailing cyber gang used to hack even government website | मुलींचा फेक ID, Video कॉल, ब्लॅकमेलिंग अन्...; सरकारी वेबसाईट करायचे हॅक, झाला पर्दाफाश

फोटो - आजतक

राजस्थानच्या धौलपुरमध्ये सायबर फसवणूक करणारी टोळी पकडण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून आधार कार्ड, लॅपटॉप, मोबाईल, चेकबुक, पासपोर्ट, पासबुक, डेबिट कार्डसह बाईक, स्कूटर जप्त केली आहे. हे आरोपी अपहरण झाल्याचं खोटं सांगून लोकांच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळायचे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हे सर्व आरोपी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि धौलपूर येथील रहिवासी आहेत. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.

धौलपूर शहर पोलीस उपअधीक्षक तपेंद्र मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिया पोलीस स्टेशनचे एसएचओ देवेश कुमार यांना एका व्यक्तीकडून माहिती मिळाली होती की, शहरातील एका ई-मित्र ऑपरेटरच्या दुकानात काही लोक सायबर फसवणूकीची योजना आखत आहेत. माहिती मिळताच स्पेशल पोलीस आणि सायबर टीम घटनास्थळी रवाना झाली. पोलिसांच्या पथकाने ई-मित्र ऑपरेटरच्या दुकानावर छापा टाकून घटनास्थळावरून सर्व साहित्य जप्त केलं.

पोलिसांच्या पथकाने 42 आधार कार्ड, लॅपटॉप, दीड डझन मोबाईल, 12 चेकबुक, पासपोर्ट, सात बँक पासबुक, 14 डेबिट आणि क्रेडिट कार्डसह एक बाईक आणि एक स्कूटर जप्त केली. यासोबतच काही जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 12 आरोपींना अटक केल्याचं पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अपहरणाची खोटी धमकी देऊन लोकांकडून पैसे उकळायचे. तसेच पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करायचे.

आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणींच्या नावाने बनावट आयडी तयार करून तरुणांना अडकवायचे. व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणं, अश्लील फोटो एडिट करणे, स्क्रिनशॉट आणि व्हिडीओ रेकॉर्ड करून फसवणूक करायचे. हे सायबर ठग सरकारी वेबसाइट हॅक करून पेन्शनधारकांच्या खात्यातून पैसे काढायचे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस आरोपीची चौकशी करण्यात व्यस्त आहेत.
 

Web Title: girls fake id video calls and blackmailing cyber gang used to hack even government website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.