पैशासाठी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; गर्ल्स स्कूल चौकीदारासह २ डॉक्टरही अटकेत
By प्रविण मरगळे | Published: January 15, 2021 08:58 AM2021-01-15T08:58:44+5:302021-01-15T09:01:39+5:30
याबाबत शहर पोलीस निरीक्षक यशकांत सिंह म्हणाले की, सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी उप्रेता कुमार रसेल उर्फ छोटू नेपाळचा राहणारा आहे.
लखनौ – शहरात एका अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या मुलीला नेपाळहून घेऊन येणारा गर्ल्स स्कूलचा चौकीदार आहे. शहर पोलिसांनी गुरुवारी चौकीदारासह ४ लोकांना अटक केली आहे. यात चौकीदाराने २ डॉक्टरांसह अन्य काही जणांची नावं पोलीस चौकशीत उघड केली ज्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. पोलिसांनी या सर्व आरोपींना जेलमध्ये पाठवलं आहे.
याबाबत शहर पोलीस निरीक्षक यशकांत सिंह म्हणाले की, सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी उप्रेता कुमार रसेल उर्फ छोटू नेपाळचा राहणारा आहे. याशिवाय जुन्या शहरात राहणारा जीतू कश्यप, वरुण तिवारी आणि अलीगंज येथील पांडेय टोला रहिवासी अजय कुमार उर्फ बबली यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी छोटू एका गर्ल्स शाळेत चौकीदार होता, १३ महिन्यांपूर्वी या अल्पवयीन मुलीला काम देतो सांगून तिला लखनौ येथे आणलं, याठिकाणी गोमतीनगर परिसरात तिला भाड्याने रूम दिली.
आरोपी छोटू या मुलीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. एकेदिवशी संधी मिळताच त्याने अल्पवयीन मुलीच्या चहामध्ये नशेचा पदार्थ मिसळला, ज्यामुळे ती मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला त्याचसोबत या घटनेचा व्हिडीओ बनवला. शुद्धीत आल्यावर मुलीने विरोध केला असता त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत भीती दाखवली. दहशतीखाली आलेल्या मुलीने इज्जत जाईल यामुळेच शांत राहिली असं पोलिसांनी सांगितले.
तर मुलीने ज्या ज्या वेळी विरोध केला तेव्हा आरोपी छोटूने तिला मारहाण करून रुममध्येच बंद ठेवलं. २ दिवस ती रुममध्ये भुकेने व्याकूळ झाली. यानंतरही आरोपी शांत झाला नाही. त्याने आपल्या सहकाऱ्यांना रुमवर बोलावून त्यांच्याकडून पैसे घेऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केले. वारंवार लैंगिक शोषणामुळे मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर एकेदिवशी तिला रुममधून पळण्यात यश आलं. घरी पोहचताच मुलगी आजारी पडली. रुग्णालयात तिला उपचारासाठी नेलं असता मुलगी ५ महिन्याची गर्भवती असल्याचं कळालं. त्यानंतर घडलेला प्रकार मुलीने कुटुंबीयांना सांगितला त्यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तपास केला असता आरोपी छोटूची पत्नीही या गुन्ह्यात सहभागी असल्याचं समजलं, मात्र आतापर्यंत ठोस पुरावा मिळू शकला नाही. तपास सुरू आहे. पत्नीविरोधात पुरावे मिळताच कठोर कारवाई करू, त्याचसोबत आरोपीने अनेक प्रतिष्ठीत लोकांचीही नावं घेतली आहे. त्यांचाही शोध पोलिसांकडून सुरु आहे. असं डीसीपी रईस अख्तर यांनी सांगितले.