FB वर तरुणीशी मैत्री, नंतर लग्नाची ऑफर; नकार देताच 'तो' म्हणतो, "५ लाख दे नाहीतर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 01:56 PM2024-11-04T13:56:38+5:302024-11-04T13:58:51+5:30
बीएच्या विद्यार्थिनीला फेसबुकवर मैत्री करणं चांगलंच महागात पडलं आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूरमधील बीएच्या विद्यार्थिनीला फेसबुकवर मैत्री करणं चांगलंच महागात पडलं आहे. विद्यार्थिनीने लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर तरुणाने तिला बनावट फेसबुक आयडी बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मला पाच लाख रुपये दे म्हणजे मी तुला त्रास देणार नाही असं देखील सांगितलं. मुझफ्फरपूरच्या बोचहान ब्लॉकमधील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भीतीपोटी कुटुंबीयांनी मुलीला बिहारबाहेर पाठवलं आहे. सीतामढी येथील रहिवासी असलेल्या आरोपीचं नाव महावीर कुमार आहे. महावीर याने मुलीचे वडील आणि भावाला जीवे मारण्याची देखील धमकी दिली आहे.
रविवारी मुलीच्या आईने महावीरविरोधात बोचहान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती दिल्लीत मासे विकण्याचं काम करतो. तसेत मुलगा बंगालमध्ये मजूर म्हणून काम करतो. घरात पुरुष सदस्य नसल्याने कुटुंबीय जास्त घाबरले आहेत.
आईने पोलिसांना सांगितलं की, फेसबुकवरील मैत्रीनंतर महावीरने मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मुलीने नकार देताच तरुण संतापला. या तरुणापासून वाचण्यासाठी आपल्या मुलीला वडिलांसोबत दिल्लीला पाठवलं. आता तो पती आणि मुलाला फोन करून शिवीगाळ आणि धमक्या देत आहे. तसेच त्यांच्याकडे पाच लाख रुपये मागत आहे.
बोचहान पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.