टिक -टॉकला विरोध केल्याने मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 06:17 AM2019-01-15T06:17:56+5:302019-01-15T06:18:15+5:30
भोईवाडा येथील घटना : वडिलांच्या वाढदिवशीच संपविले आयुष्य
- मनीषा म्हात्रे
मुंबई : टिक-टॉक अॅपवर भोईवाड्यातील १५ वर्षीय मुलीला स्वत:चे वेगवेगळे व्हिडीओ टाकायचे व्यसन जडले. वडिलांच्या वाढदिवसाचे क्षण ती व्हिडीओ करून सोशल मीडियावर अपलोड करत होती. हे पाहून आजीने तिला व्हिडीओ टाकण्यास विरोध केला. याच रागात मुलीने स्वत:चे आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना भोईवाड्यात घडली.
भोईवाडा परिसरात १५ वर्षीय नेहा (नावात बदल) आईवडिलांसोबत राहते. वडील खासगी कंपनीत आहेत, तर नेहा शाळेत शिकत होती. मित्र-मैत्रिणींप्रमाणे तिने मोबाइलमध्ये टिक-टॉकवर व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली. त्याला मिळणाऱ्या कमेट्समुळे व्हिडीओ टाकण्याचे प्रमाण वाढले. शुक्रवारी वडिलांच्या वाढदिवस साजरा झाला. तेव्हा नेहा सतत मोबाईलवर असल्याचे पाहून आजी ओरडली आणि व्हिडीओ टाकू नको, सांगून मोबाइल काढून घेतला.
नेहाने रडत बाथरूम गाठले. तेथेच ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला, तरी ती न परतल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी बाथरूमकडे धाव घेतली. आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी रात्री तिने प्राण सोडले. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळावरून सुसाइड नोट मिळाली नसल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली.
आजी ओरडल्याने आला राग
शुक्रवारी वडिलांचा वाढदिवस होता. त्यांच्यासोबतचे वेगवेगवेळे व्हिडीओ अपलोड करून, नेहा ते टिक-टॉकवर सातत्याने टाकत होती. वाढदिवसाचे सेलिब्रेशन सोडून सतत मोबाइल बघणाºया नातीला आजी ओरडली. व्हिडीओ टाकू नको, असे सांगून मोबाइल काढून घेतला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या नेहाने रागाच्या भरात हे पाऊल उचलले.