कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाख द्या, अन्यथा बघून घेतो; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने धमकीचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 09:11 PM2020-07-20T21:11:58+5:302020-07-20T21:12:43+5:30
तुम्ही २५ लाख रुपये द्या, पर्वती येथील कार्यकर्त्याकडे रक्कम द्या...
पिंपरी : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाख द्या, पैसे न दिल्यास तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी देणारा फोन भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने शहरातील एका रुग्णालयास आला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गरजूंना मदत करण्यात येत आहे. विविध राजकीय पक्ष देखील त्यासाठी सरसावले आहेत. अशाच पद्धतीने मदत करण्यासाठी पैशांची मागणी करणारा फोन शहरातील एका नामांकित रुग्णालाच्या लँडलाइन फोनवर आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून त्यांचा पीए बोलत आहे, कोरोनामुळे गोरगरिबांना मदत करायची आहे. त्यासाठी तुम्ही २५ लाख रुपये द्या, पर्वती येथील कार्यकर्त्याकडे रक्कम द्या, असे सांगितले.
पैसे न दिल्यास बघून घेण्याची भाषा फोनवरील व्यक्तीने केली. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने रुग्णालयाच्या मालकाचा फोन नंबर घेऊन त्यांच्याकडेही पैशांची मागणी केली. त्यांनी याबाबत रुग्णालयाचे काम पाहणाऱ्या एका डॉक्टरांशी बोलण्यास सांगितले. फोन क्रमांकाची माहिती येत असलेल्या अॅपवर देखील त्या फोनचे नाव भाजप प्रदेशाध्यक्षाचे येत होते.
संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांनी याबाबत थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. मात्र आपण किंवा आपल्या कार्यालयातून अशा प्रकारचे फोन कोणालाच केले नसून याबाबत पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर याबाबत म्हणाले, याप्रकरणी शुक्रवारी (दि. १७) अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. फोन करणाºया व्यक्तीचा शोध सुरू आहे.