‘५०० कोटी द्या, अन्यथा स्टेडियम उडवून देऊ’; भारत-पाक सामन्यापूर्वी धमकीचा मेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 08:53 AM2023-10-12T08:53:54+5:302023-10-12T08:54:34+5:30
आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशचा असून तो सध्या राजकोटमध्ये वास्तव्यास आहे.
राजकोट : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची सुटका करावी आणि सरकारने ५०० कोटी रुपये द्यावे, अन्यथा अहमदाबाद येथील नरेंद्र मोठी स्टेडियम बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देणाऱ्यास अहमदाबाद पोलिसांनी राजकोट येथून अटक केली. आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशचा असून तो सध्या राजकोटमध्ये वास्तव्यास आहे.
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारत- पाकदरम्यानचा हायहोल्टेज सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तत्पूर्वी आरोपीने त्याच्या मोबाइलवरून मेल पाठवत ही धमकी दिली. अहमदाबाद गुन्हे शाखेने त्याची दखल घेत आरोपीस अटक केली. त्याला कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती; परंतु, त्याने ही धमकी का दिली, याचा तपास पोलिस करीत आहेत.
भारत-पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या सामन्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. सुमारे १४ हजार पोलिसांचा फौजफाटा या सामन्यावेळी स्टेडियम आणि परिसरात सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहे.