एक कोटी द्या, अन्यथा मुलांचे अपहरण करू ! डॉक्टर दाम्पत्याकडे मागितली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 08:20 AM2021-06-18T08:20:23+5:302021-06-18T08:21:08+5:30
सप्टेंबर-२०२० मध्ये कोरोना उपचारासाठी इटनकर दाम्पत्य मनीष नगरातील डॉ. तुषार पांडे यांच्या रुग्णालयात होते. पांडे दाम्पत्याच्या प्रॅक्टीसवरून त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचा अंदाज शीतलला आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एक कोटी रुपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू, असे पत्र पाठवून डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी धमकविल्याचा प्रकार पुढे आला आहे. या संवेदनशील प्रकरणाचा बेलतरोडी पोलिसांनी तपास करून पाच दिवसात छडा लावत फॅशन डिझायनर शीतल इटनकर (४५, शिल्पा सोसायटी) हिला अटक केली आहे.
शीतलचा पती एका शासकीय विभागात अभियंता पदावर कार्यरत आहे. त्याला दीड लाख रुपये वेतन मिळते. त्यांनी ५० लाख रुपयांचे कर्ज घेऊन घर बांधले. त्याचा मासिक ६० हजाराचा बॅंकेचा हप्ता जातो. उर्वारित पैशात घरखर्च भागत नाही. यामुळे फॅशन डिझायनर असलेल्या शीतलला बुटिक सुरू करायचे होते. पतीने पैसे न दिल्याने नात्यात दुरावा निर्माण झाला होता. सप्टेंबर-२०२० मध्ये कोरोना उपचारासाठी इटनकर दाम्पत्य मनीष नगरातील डॉ. तुषार पांडे यांच्या रुग्णालयात होते. डॉ. पांडे यांच्या पत्नीदेखील चिकित्सक आहेत. पांडे दाम्पत्याच्या प्रॅक्टीसवरून त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचा अंदाज शीतलला आला होता. त्यांना दोन मुले असल्याचे फेसबूक अकाऊंटवरून तिने शोधले होते. त्या मुलांचे अपहरण करून रक्कम उकळण्याची योजना तिने आखली.
१० जूनला कुरिअरच्या माध्यमातून धमकीपत्र पाठविले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ते डॉ. पांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली
अति महत्वाकांक्षा ठरली घातक
पतीच्या वेतनातून मुलींचे शिक्षण आणि घरखर्च सहज करता आला असता. मात्र स्वत:चे बुटिक सुरू करून शीतल बिझनेस वूमन होऊ इच्छित होती. या अतिमहत्वाकांक्षेपोटी तिने गुन्ह्याचा अविचारी मार्ग स्वीकारला.