पैसे दे, अन्यथा तुझ्यासह मुलाला मारू; न घेतलेल्या कर्जासाठी महिला वास्तुविशारदाला दिल्लीतून धमक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 09:12 AM2021-10-29T09:12:21+5:302021-10-29T09:12:41+5:30
Crime News : पीडित महिला या कांदिवलीतील नामांकित महाविद्यालयात वास्तुविशारद म्हणून कार्यरत आहे. चारकोप परिसरात पती व मुलासह राहतात.
मुंबई : कोणतेही कर्ज घेतले नसताना कांदिवलीतील महिला वास्तुविशारदाला आणि तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची घटना घडली. गेल्या आठवड्यापासून तेरा विविध मोबाइल क्रमांकावरून या धमक्या दिल्या असल्याची तक्रार समता पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
पीडित महिला या कांदिवलीतील नामांकित महाविद्यालयात वास्तुविशारद म्हणून कार्यरत आहे. चारकोप परिसरात पती व मुलासह राहतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर, २०२१ रोजी त्यांना तुमच्या भावाने कर्ज घेतले असून त्याला कनेक्ट करून घ्या अशा आशयाचे फोन आले.
त्यानुसार पीडितेने त्यांचे भावाशी बोलणे करून दिले आणि बहिणीला त्रास न देता माझ्याशी संपर्क साधा अशी विनंती भावाने फोन करणाऱ्यांना केली.
प्रत्यक्षात गोरेगावच्या एका खासगी बँकेतून पीडितेच्या भावाने घेतलेले कर्ज हे फेडण्यात आल्याने बँकेला कोणतेही देणे लागत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कोणत्या बँकेच्या कर्जाची मागणी ते करत आहेत याची मेलमार्फत माहितीदेखील भावाने मागितली.
जी न देता एका लिंकवर पीडितेने पैसे पाठवावे असे त्यांना धमकावले जात आहे. त्यांनी समतानगर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी हिरे यांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. तसेच पीडितेने कॉलर्सचे फोन क्रमांक ब्लॉक केल्यानंतर त्यांच्या ऑफिसच्या क्रमांकावर फोन येण्यास सुरुवात झाली आहे.
मुख्य म्हणजे पीडितेशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांना आणि त्यांच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यास सुरुवात झाल्याने पोलिसांनी आरोपींना शोधत अटक करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पोलिसांना १३ मोबाइल क्रमांकाची यादी दिली आहे. हे सर्व क्रमांक दिल्लीचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.