दाभोलकर हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करा; कुटुंबीयांचा उच्च न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:53 AM2022-07-08T06:53:28+5:302022-07-08T06:53:47+5:30

पानसरे यांच्या हत्याकटातील प्रमुख आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना अटक करण्यात एसआयटीला यश आलेले नाही

Give Narendra Dabholkar murder to ATS; Family's application to the High Court | दाभोलकर हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करा; कुटुंबीयांचा उच्च न्यायालयात अर्ज

दाभोलकर हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग करा; कुटुंबीयांचा उच्च न्यायालयात अर्ज

Next

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे, लेखक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या सगळ्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना जेरबंद करण्यात तपासयंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. या चारही हत्यांमागील सूत्रधाराचा तपास करण्यासाठी दाभोलकर आणि पानसरे हत्याकटाचा तपास सीबीआय आणि एसआयटी यांच्याकडून काढून घेत महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग करावा, असा अर्ज दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने २१ जुलैपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. 

पानसरे यांच्या हत्याकटातील प्रमुख आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना अटक करण्यात एसआयटीला यश आलेले नाही. २०१० मध्ये गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोपही सारंग याच्यावर आहे. एनआयएही उभयतांच्या मुसक्या आवळण्यात अपयशी ठरली आहे. तपासाधिकारी व कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे कामाचा अतिरिक्त भार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पानसरे व दाभोलकर हत्याकटाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग करावा, अशी विनंती पानसरे आणि दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी ॲड. अभय नेवगी यांच्यामार्फत न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. व्ही. जी. बिश्ट यांच्या खंडपीठाला केली. 

तपासाधिकाऱ्याच्या बदलीचा मार्ग मोकळा
पानसरे हत्याकटाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमली. कोल्हापूरचे अतिरिक्त अधीक्षक तिरुपती काकडे या प्रकरणातील तपासाधिकारी आहेत. मार्च, २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने त्यांची बदली न करण्याचे आदेश दिले. साडेचार वर्षे काकडे एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांची बदली करण्याची परवानगी मिळावी, यासाठी  सरकारने कोर्टात अर्ज केला. काकडेंच्या जागी त्यांच्याच दर्जाच्या अधिकाऱ्याची पानसरे प्रकरणी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करू, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. 

Web Title: Give Narendra Dabholkar murder to ATS; Family's application to the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.