पाकिस्तानला जा! भीक मागणाऱ्या मुस्लिम व्यक्तीस मुलासह मारहाण, सोशल मीडियावर VIDEO VIRAL
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 09:52 PM2021-08-25T21:52:43+5:302021-08-25T21:53:44+5:30
Beaten in Ajmer :पोलिसांनी हे देखील सांगितले की, आरोपी म्हणतात की, हे लोक गुन्हा करून आले असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.या संशयामध्ये त्यांनी या कुटुंबाला मारहाण केली.
नवी दिल्ली - अजमेरमध्ये भीक मागत असलेल्या एका मुस्लीम कुटुंबातील दोन लोकांसोबत मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे. आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि पाकिस्तानला जाण्यास सांगितले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ही घटना रामगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. सतर्कता दाखवत पोलिसांनी पाच जणांना अटकही केली आहे.
हे मुस्लिम कुटुंब उत्तर प्रदेशच्या कानपूरचे आहे. हे कुटुंब रामगंज पोलीस स्टेशन परिसरातील सुभाष नगरमध्ये भीक मागत होते, तिथे पाच जणांनी त्यांना नाहक त्रास दिला. या लोकांना मारहाण करून पाकिस्तानात जाण्यास सांगितले. हे कुटुंब ऑडिओमध्ये एक गाणे वाजवून भीक मागत होते.
एसएचओ सतेंद्र सिंह नेगी यांनी सांगितले की, ही घटना २० ऑगस्ट २०२१ ची आहे. सोशल मीडियाद्वारे एक व्हिडिओ निदर्शनास आला, ज्यात मुस्लिम माणसाला काही लोकांनी मारहाण केली. या प्रकरणात कोणीही एफआयआर नोंदवला नव्हता, या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. तपासादरम्यान असे आढळून आले की, ललित नावाच्या व्यक्तीने काही मित्रांसह ही घटना घडवून आणली. या व्यक्तीला २० तारखेलाच अटक करण्यात आली. चौकशी केल्यानंतर दुसऱ्या चार आरोपींना दुसऱ्या दिवशीही अटक करण्यात आली. या पाच जणांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पीडितांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ते अद्याप सापडले नाहीत. कदाचित ते परत गेले. पोलिसांनी हे देखील सांगितले की, आरोपी म्हणतात की, हे लोक गुन्हा करून आले असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.या संशयामध्ये त्यांनी या कुटुंबाला मारहाण केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी एका भीक मागणाऱ्या कुटुंबाला मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी मारहाण करताना दिसत आहेत की, ते सोनसाखळी काढून घेऊन पळून जातात. पाकिस्तानला जा, तिथे भीक मागायला मिळेल असे म्हणत आरोपी त्यांच्या खिशातून पैसे काढून या लोकांची तपासणीही करत आहेत. ते वारंवार सांगत आहेत की, इथे येऊ नका. या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.