गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना सतवणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 09:23 PM2019-07-26T21:23:06+5:302019-07-26T21:27:13+5:30
काल गुरुवारी पोलिसांनी आठ महिला फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई करताना त्यांना ताब्यात घेतले.
मडगाव - गोव्यातील समुद्रकिनारे सर्वानाच भुरळ टाकत असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते, मात्र या पर्यटकांना फिरत्या विक्रेत्यांच्या ससेमिराला सामोरे जावे लागत असून, दक्षिण गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर पर्यटकांना सतवणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांवर पोलिसांनी आता कारवाईचे सत्र सुरु केले आहे. काल गुरुवारी पोलिसांनी आठ महिला फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई करताना त्यांना ताब्यात घेतले.
कोलवा हा गोव्यातील एक प्रसिध्द समुद्रकिनारा असून, येथे देशी - विदेशी पर्यटकांची मोठी रिघ असते. सध्या पावसाळा सुरु असला तरी येथे मोठया प्रमाणात पर्यटक येत असतात. फिरते विक्रेते हे पर्यटकांना सतावित असतात. आपल्याकडील वस्तु विकत घेण्याचा ते तगादा लावतात. किनारपट्टीवर फिरत्या विक्रेत्यांनी ठाण मांडलेले आहे. त्यावर कारवाईची मागणी स्थानिक लोकांकडून अनेक वेळा होत होती.
पोलिसांनी ताब्यात घेतलल्या आठ महिला फिरत्या विक्रेत्या या कोलवा भागातच रहात होत्या. मात्र त्या मूळच्या कर्नाटकातील गदग येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. टेटू गोंदवून घेण्याचा तगादा त्या पर्यटकांकडे करीत होत्या. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेउन मागाहून रितसर अटक केल्याची माहिती कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल परब यांनी दिली. भारतीय दंड संहितेंच्या 34 कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. यापुढेही अशी कारवाई सुरु राहिल असे निरीक्षक परब म्हणाले.