३ लाखांची चोरी शोधता शोधता सापडला १२.८५ लाखांचा मुद्देमाल, तिघांना अटक
By पंकज शेट्ये | Published: August 28, 2023 03:18 PM2023-08-28T15:18:19+5:302023-08-28T15:18:34+5:30
मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चोरीचा वास्को पोलीसांनी लावला छडा
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: वास्को पोलीस दाबोळी परिसरात घडलेल्या चोरीचा छडा लावण्यासाठी रविवारी (दि.२७) रात्री गस्ती लावून चौकशी करित असताना त्यांना दुसºया पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपींना गजाआड करून चोरीला गेलेला माल जप्त करण्यात यश प्राप्त झाझे. चिखली येथील ‘जॉर्गस पार्क’ जवळ रात्री तीन इसम संशयास्पद फीरत असल्याने वास्को पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरवात केली. पोलीसांकडून करण्यात येणाºया चौकशीवेळी तिघांनी मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गोदामातून १२ लाख ८५ हजाराची सामग्री चोरी करून बिर्ला येथील एका ‘स्क्रेप यार्ड’ मध्ये लपवून ठेवल्याची कबूली दिली. त्यानंतर वास्को पोलीसांनी तेथे छापा टाकून चोरीला गेलेला १२ लाख ८५ हजाराचा माल जप्त केला.
दाबोळी येथील एका कंपनीच्या ‘शॅड’ मधून तीन लाखाची सामग्री चोरीला गेल्याची तक्रार नुकतीच वास्को पोलीस स्थानकावर देण्यात आली आहे. पोलीस त्याप्रकरणात चौकशी करण्यासाठी गस्त मारत असताना त्यांना रविवारी रात्री चिखली ‘जॉर्गस पार्क’ जवळ तीन लोक संशयास्पद फीरत असल्याचे आढळून आले. दाबोतील चोरी प्रकरणात हे तिघे संशयित असू शकतात असा संशय आल्यानंतर पोलीसांनी त्यांना अडवून त्यांच्याशी चौकशीला सुरवात केली. मात्र ते तिघेजण योग्यरित्या उत्तर देत नसल्याने त्यांना ताब्यात घेऊन वास्को पोलीस स्थानकावर नेले. तेथे पोलीसांनी त्यांच्याशी कसून चौकशीला सुरवात केली. त्यावेळी तिघांनी मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या गोदामातून विविध सामग्री चोरी केल्याची कबूली दिली. चोरी केलेली सामग्री बिर्ला येथील एका ‘स्क्रेप यार्ड’ मध्ये लपवून ठेवल्याची माहीती वास्को पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित त्या ‘स्क्रेप यार्ड’ वर छापा टाकला. वास्को पोलीसांनी त्या ‘स्क्रेप यार्ड’ वर छापा टाकला असता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या गोदामातून चोरीला गेलेली १२ लाख ८५ हजाराची सामग्री तेथे लपवून ठेवल्याचे त्यांना आढळून आले. पोलीसांनी त्वरित ती सामग्री ताब्यात घेऊन जप्त केली.
त्या चोरी प्रकरणाबाबत अधिक माहीतीसाठी पत्रकारांनी वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक यांना संपर्क केला असता मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गोदामातून चोरीला गेलेला सर्व माल जप्त केल्याची माहीती दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहाय्यक अभियंत्याने जप्त केलेला तो माल चोरीला गेला होता अशी पुष्टी केल्याचे निरीक्षक नायक यांनी सांगितले. २४ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी सडा येथील गोदामात गेले असता त्या गोदामाचे ‘शटर’ वाकवून तेथून अज्ञात चोरट्यांनी सामग्री लंपास केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर त्याप्रकरणात मुरगाव पोलीस स्थानकावर तक्रार नोंद केल्यानंतर पोलीस चौकशी करित होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गोदामातून १२ लाख ८५ हजाराची सामग्री चोरी केल्याप्रकरणात अटक केलेल्या त्या संशयित आरोपींची नावे नागू गोलार (वय ५०), ओंन्बा राथोड (वय ४०) आणि अपन्ना राथोड (वय ४८) अशी असल्याची माहीती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. वास्को पोलीसांनी त्या तिघांनाही सीआरपीसी च्या ४१ कलमाखाली अटक केली असून चोरी प्रकरणातील पुढची चौकशी करण्यासाठी वास्को पोलीस त्या तिघांनाही मुरगाव पोलीस स्थानकाच्या ताब्यात देणार असल्याचे सांगितले.