"दुसऱ्या खोलीत झोपायचो म्हणून भांडायची"; लेकाची हत्या करणाऱ्या सूचनाचा नवरा म्हणतो....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:30 PM2024-01-16T16:30:41+5:302024-01-16T16:35:58+5:30
Suchana Seth : सूचनाचा नवरा वेंकटरमनने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे.
सूचना सेठने गोव्यामध्ये आपल्या चार वर्षांच्या लेकाची हत्या केली. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सूचनाचा नवरा वेंकटरमनने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. मुलाच्या जन्मानंतर मी दुसऱ्या खोलीत झोपू लागलो, या गोष्टीवरून माझी बायको माझ्याशी सतत भांडायची. सूचना नेहमीच प्रत्येक गोष्टीचा दोष मला देते, माझ्यावर आरोप करायची तिला सवय आहे. मुलाच्या जन्मानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झालं अशी माहिती सूचना सेठच्या पतीने दिली आहे.
वेंकटरमनने दिलेल्या माहितीनुसार, "9 वर्षांपासून आमच्यामध्ये सर्व काही ठीक होतं. पण 2019 मध्ये आम्हाला मुलगा झाला तेव्हापासून सूचनाच्या वागण्यात खूप बदल झाला. माझा मुलगा लहान होता म्हणून मी दुसऱ्या खोलीत झोपू लागलो. मात्र सूचना या मुद्द्यावरून माझ्याशी सतत भांडू लागली. मुलाची जबाबदारी मी घेत नाही, असं म्हणायची. या गोष्टीवरून वाद सुरू झाला आणि पुढे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं."
"माझ्या मुलाला मला भेटायचं होतं. पण सूचनाला हेच आवडायचं नाही. यापूर्वी तिने मला माझ्या मुलाला भेटू दिलं नाही. मात्र हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर मला माझ्या मुलाला भेटण्याची परवानगी मिळाली. डिसेंबर 2022 पर्यंत मी माझ्या मुलाला भेटू शकलो नाही. पण न्यायालयाच्या आदेशानुसार मी माझ्या मुलाला जानेवारी 2024 पासून भेटू शकणार होतो. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला माझ्या मुलाला भेटायचे होतं. पण सूचना त्याला गोव्याला घेऊन गेली. याबाबत तिने कोणालाही सांगितलं नाही."
"मी माझ्या मुलाला भेटण्याची वाट पाहत होतो. ठरलेल्या तारखेला (7 जानेवारी) संध्याकाळपर्यंत मी त्या ठिकाणी वाट पाहत राहिलो की माझ्या मुलाला घेऊन सूचना येईल आणि मी त्याला भेटू शकेन. मी मुलाची वाट पाहत राहिलो, पण ती आली नाही. मी सूचनाला अनेकदा फोनही केला. पण तिने माझा कॉल उचलला नाही. तुम्ही ठीक आहात का? असा मेसेजही केला पण तिने मेसेजचा रिप्लाय देखील दिला नाही" असं वेंकटरमनने म्हटलं आहे.