ट्रॉली बॅग, कपड्यांखाली लेकाचा मृतदेह; पकडल्यावरही सूचनाच्या चेहऱ्यावर ना ताण, ना पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 04:40 PM2024-01-12T16:40:58+5:302024-01-12T16:51:20+5:30
चिन्मयची हत्या करणाऱ्या सूचना सेठबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
मुलगा चिन्मयची हत्या करणाऱ्या सूचना सेठबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. यामध्ये एक पत्र, कफ सिरप, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि रक्त असे पुरावे आहेत, ज्याच्या आधारे पोलीस हत्येमागचं प्रत्येक सत्य बाहेर आणत आहेत. पोलीस तपासादरम्यान, सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरने हत्येची पद्धत सांगितली आहे. निष्पाप मुलाचा गळा दाबण्यासाठी उशी किंवा टॉवेलचा वापर केला गेला असावा, असं त्यांनी सांगितलं.
गळा दाबल्याने मुलाचा मृत्यू झाला. पोलीस इन्स्पेक्टरने सूचनाला गाडीतून खाली उतरायला सांगताच तिच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती. माहिती मिळताच पोलिसांनी ड्रायव्हर डिसूझाला गाडीची डिकी उघडण्यास सांगितलं. त्यातून लाल रंगाची ट्रॉली बॅग बाहेर काढली. सूचनाच्या डोळ्यासमोर बॅग उघडत होते. पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते.
बॅग उघडून वरचे कपडे काढले असताना खाली एका मुलाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहिल्यानंतरही सूचनाच्या चेहऱ्यावर ना कोणताही ताण होता, ना तिला कसलाही पश्चाताप झाला होता. हे पाहून पोलीस देखील हैराण झाले. मात्र सर्वात जास्त धक्का हा ड्रायव्हरला बसला आणि तो अस्वस्थ झाला. कारण त्याने जी लाल रंगाची बॅग उचलून कारमध्ये ठेवली त्यात एका मुलाचा मृतदेह होता. त्याचा यावर सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता.
या प्रकरणात डीजीपी गोवा जशपाल सिंह यांनी आज तकशी संवाद साधताना सांगितलं की, आरोपी महिला सूचना सेठ तपासात सहकार्य करत नाही. न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही महिला 6 जानेवारी रोजी आली होती आणि 8 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता हॉटेलमधून निघून गेली होती. ही महिला आपल्या मुलासह आली होती, मात्र मुलाला न घेताच निघून गेल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय होता. यानंतर हॉटेलच्या खोलीची साफसफाई केली असता खोलीत रक्ताचे डाग आढळून आले.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी 112 वर फोन करून एक महिला आल्याची माहिती दिली. ती गेली तेव्हा मुलगा तिच्यासोबत नव्हता आणि खोलीत रक्ताचे डाग आढळून आल्याचं सांगितलं. यावर पोलिसांनी अधिक माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. महिला टॅक्सीने गेल्याचं दिसलं. पोलिसांनी टॅक्सी चालकाशी संपर्क साधला आणि त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितलं. यावर टॅक्सी चालक पोलीस ठाण्यात गेला. जिथे नंतर मुलाचा मृतदेह बॅगमध्ये असल्याचं आढळून आलं.