गोव्याचा स्नूकर खेळाडू निघाला अट्टल घरफोड्या, पर्वरी पोलिसांकडून दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 04:41 PM2023-11-15T16:41:41+5:302023-11-15T16:43:07+5:30
घरफोड्यांपैकी एकजण राष्ट्रीय स्नूकर खेळाडू आहे. संशयितांनी गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे.
शेखर वायंगणकर
पर्वरी : पर्वरी पोलिसांनी दोन अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून सुमारे १६२ ग्रॅमचे सोन्याचे दागिन्यांसह साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या घरफोड्यांपैकी एकजण राष्ट्रीय स्नूकर खेळाडू आहे. संशयितांनी गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे.
शब्बीरसाहेब शदावली (३०,गदग,कर्नाटक) आणि सुलेमान शेख (३०, वास्को) अशी दोघा संशयित घरफोड्यांची नावे आहेत. यापैकी सुलेमान हा स्नूकर/पूल खेळाडू असून त्याने नुकत्याच येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही भाग घेतला होता. जुगाराच्या नादाने तो घरफोड्या करण्यात गुंतला असे तपासात उघड झाले.
पोलिसांनी सांगितले की, पर्वरी येथे संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी दुचाकीसह अटक केली. ते दुचाकीवरून कुलूपबंद घरांची टेहळणी करीत होते असे पोलिसांना आढळले. चोरीसाठी त्यांनी दोन दुचाकी चोरून आणल्या होत्या. पोलिसांच्या पथकाने म्हापसा, पर्वरी आणि इतर ठिकाणी ५० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यावरुन सीसीटीव्ही फुटेजवरून आणि तांत्रिक सर्व्हेलन्सच्या साहाय्याने संशयितांचा शोध घेतला. दोघांकडून सुमारे साडेआठ लाख किमतीचे १६२ ग्रॅम सुवर्णालंकार जप्त केले.
संशयितांना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन आणि पोलिस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल परब, उपनिरीक्षक सीताराम मळीक, सर्वेश भंडारी, महिला उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर, सहाय्यक उपनिरीक्षक उमेश पावसकर, हवालदार नितेश गावडे, महादेव नाईक, उत्कर्ष देसाई, योगेश शिंदे, सिद्देश नाईक आदी सहकाऱ्यांनी भाग घेतला होता.
सुलेमानला जुगाराचा नाद
अटक केलेल्या दोघा घरफोड्यांपैकी सुलेमान शेख हा स्नूकर/पूल खेळाडू आहे. त्याने नुकत्याच येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. त्याला जुगार खेळण्याचा नाद होता. आर्थिक चणचणीमुळे त्यांनी चोऱ्या करण्याचा मार्ग निवडला होता.
चोरलेले सोने तारण ठेवले
शब्बीरसाहेब आणि सुलेमान या दोघाही घरफोड्यांनी चोरलेले दागिने विक्रीसाठी वेगळाच मार्ग निवडला. संशयितांनी अनेक फायनान्स कंपन्यांमध्ये हे सोने तारण ठेवले. चोरट्यांनी तारण म्हणून ठेवलेले सुमारे सहा लाखांचे सोने पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी संशयितांकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.