पुणे विमानतळावर महिलेकडून सोन्याची बिस्कीटे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 08:21 PM2019-07-15T20:21:18+5:302019-07-15T20:21:34+5:30
गोवा येथून विमानाने आलेला महिला प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने १८ लाख ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत..
पुणे : गोवा येथून विमानाने आलेला महिला प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने १८ लाख ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. हे सोने बँकाक येथून तस्करी करण्यात आल्याचा संशय आहे. अलीकडच्या काळात देशांतर्गत विमानातील प्रवाशाकडून तस्करी केल्याची ही पहिलीच घटना आहे. उषा सिंग असे या महिला प्रवाशाचे नाव आहे. स्पाईस जेट कंपनीच्या विमानातून ती दि. १० जुलै रोजी गोवा येथून पुणेविमानतळावर आली. विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या महिलेची तपासणी केली. या तपासणीमध्ये महिलेकडे ५५७.६४ ग्रॅम वजनाची सोन्याची तीन बिस्किीटे आढळून आली. त्याची किंमत १८ लाख ९० हजार ४०० रुपये एवढी आहे. या बिस्कीटांना काळ्या रंगाची चिकटपट्टी लावून तिने आपल्या बुटामध्ये लपविले होते. ही महिला प्रवासी गोव्यातून विमानात बसली असली तरी हे सोने बँकाकवरून आल्याचा संशय आहे. गोव्यातून पुण्यात आलेल्या विमानाचा मार्ग बँकाक ते कोलकाता होता. कोलकातामध्ये आल्यानंतर हे विमानाची देशांतर्गत वाहतुक सुरू झाली. कोलाकाता-बंगलुरू-गोवा-पुणे असा या विमानाचा मार्ग होता.विमानातील स्वच्छतागृहामध्ये सोने लपवून ठेवण्यात आले होते. संबंधित महिला गोव्यात विमानात चढल्यानंतर तिने हे सोने काढून बुटामध्ये लपविले. या बिस्कीटांवर मेटालर, सिंगापुर असे लिहिले आहे, अशी माहिती सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली. हे सोने बँकॉकमध्ये लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मागील काही वर्षात पुणे विमानतळावर देशांतर्गत विमानातून सोन्याची तस्करी झाल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. विमानतळावरून दुबई येथून येणाऱ्या प्रवाशांकडून सोन्याची तस्करी अनेक पकडण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
------------