सराईत सोनसाखळीचोर टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:46 AM2020-11-21T00:46:57+5:302020-11-21T00:47:00+5:30
गुन्हे शाखेची कारवाई : २० लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी झारखंड व ओडिशाच्या सीमेवरून सराईत सोनसाखळी चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २० गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यामधील २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा पोलिसांकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्हेगारांचा मागोवा घेत असताना गुन्हे शाखा कक्ष २चे हवालदार सुनील साळुंखे यांना एका टोळीच्या म्होरक्याची माहिती मिळाली होती. तो रेल्वेने झारखंड येथून कोलकाता येथे पळ काढत होता. उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सहायक निरीक्षक गणेश कराड, संदीप गायकवाड, शरद ढोले, प्रवीण फडतरे यांचे पथक तयार केले होते.
या पथकाने झारखंड पोलिसांच्या मदतीने धावत्या रेल्वेत झाडाझडती घेऊन तन्वीर शेखच्या
मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान त्याच्याकडून इतरही साथीदारांची माहिती मिळाली असता
त्यांनाही अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली आहे.
तन्वीर, मोहम्मद इब्राहिम शेख (२२), अखिल शरीफ रहमान शेख (२५), तशरुफ बेइदुर रहमान शेख (२२), शबनम शब्बीर शेख (२५) व हारून लाला सय्यद (२३) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात केलेल्या २० गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली व सुमारे २० लाखांचा चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
या टोळीच्या अटकेने इतर टोळ्यांमध्ये कारवाईचा धाक तयार होऊन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.